आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन:सुमित्राताईने आशयकेंद्रित चित्रपटांची नवी वाट रुळवली

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 चित्रपट, 50 हून अधिक लघुपट व 3 मालिकांचे दिग्दर्शन
  • चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (७८) यांचे सोमवारी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या कर्करोगाने आजारी होत्या. सुमारे ४० वर्षांच्या दिग्दर्शकीय प्रवासात त्यांनी १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि ३ दूरदर्शन मालिका केल्या. सुमित्राताईंनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासोबत अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट व लघुपटांची निर्मिती केली. बाई, पाणी या सुरुवातीच्या लघुपटांनंतर त्यांनी १९९५ मध्ये दोघी हा चित्रपट केला. त्यांनी दिग्दर्शित केलेले दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु हे चित्रपट गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन
शब्दांपलीकडच्या जागेत सिनेमा सुरू होतो. सुमित्राताईचा ‘अस्तु’ हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हत्तीची ‘इमेजरी’ किती विलक्षण आहे त्यातली... खेडेगावातल्या परिस्थितीवश कुटुंबाची कुचंबणा, असहायता जशी ‘दोघी’मध्ये तिने मांडली होती... त्या चित्रचौकटींना सलाम ! तिच्या प्रत्येक कलाकृतीत असे खिळवून ठेवणारे क्षण भेटतात आणि तिला इतरांपासून वेगळं, फार वैशिष्ट्यपूर्ण करतात...

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि प्रेक्षक अशा भूमिकांमधून स्वतः वावरताना, सुमित्राताईचे हे योगदान किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा पुन्हा जाणीव होते. दीर्घकाळ चित्रपटसृष्टीतल्या बेभरवशी वातावरणात राहूनही सुमित्राताईनी कधी ‘बाॅक्स ऑफिस’ची फिकीर केली नाही, पण त्याचबरोबर चित्रपटाचे स्वतःचे असे एक अर्थकारण असते, जे तिने फार उत्तम हाताळले, अगदी अखेरपर्यंत…

‘आपल्याला जे आणि जसं सांगायचंय, ते आणि तसंच तिने सांगितलं... ते मांडण्यासाठी दिखाऊ भपकेबाजपणा केला नाही. साधेपणाने तरीही ठामपणे आणि नेमकेपणाने ती मांडत गेली…’ ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या चित्रपट कारकीर्दीचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता किरण यज्ञोपवित यांना जाणवलेले वेगळेपण त्यांच्याच शब्दांत...

आपल्याला जे आणि जसं सांगायचंय, ते आणि तसंच तिने सांगितलं. ते मांडण्यासाठी दिखाऊ भपकेबाजपणा केला नाही. साधेपणाने तरीही ठामपणाने आणि नेमकेपणाने ती मांडत गेली. हे सारं करताना तिनं नव्या पिढीला आपल्या कामात छानपैकी जोडून घेतलं. अगदी सुनीलपासून ते वरुण नार्वेकर, चिन्मय दामलेपर्यंत... सचिन कुंडलकर, गिरीश आणि उमेश कुलकर्णी, मोहित टाकळकर, पर्ण पेठे... अनेक नावं घेता येतील, जे आज स्वतंत्रपणे उत्तम काम करत आहेत. अनेकदा यशस्वी टीम रिपीट केली जाते. सुमित्राताईचे वेगळेपण इथेही दिसले. तिने काही कलाकार वगळता आपली टीम फ्रेश ठेवली.

सर्वसाधारणपणे फिल्ममेकर चित्रपटाचा विचार करताना प्रेक्षकांना खेचणारं मॅजिक विषयात आहे का, याकडे लक्ष देतात. पण, या जादुई घटकाच्या पलीकडे जाऊन अतिशय साधेपणाने, छोट्या विषयातल्या भावबंधाकडे नेण्याचं विलक्षण सामर्थ्य सुमित्राताईच्या चित्रपटांत आहे. फिल्ममेकर असतानाच तिला चित्रकला, रंगभूमी, अभिवाचन, गायन, वादन, नृत्य, शिल्प अशा सगळ्या विश्वात काय घडतंय, कोणते प्रयोग होत आहेत, याची उत्सुकता असायची. नव्या धडपडीला ती प्रोत्साहन द्यायची, कौतुक करायची.

त्यात अकृत्रिम साधेपणा होता. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. माहितीपटांचे विषय तिने चित्रपटांचे मध्यवर्ती विषय केले. आणि असे मांडले, की ते प्रेक्षकांच्या भावविश्वाचा भाग बनले. ही एक नवी इडियम म्हणावी लागेल. तंत्राच्या आहारी न जाता, आशयाच्या अंगाने चित्रपट मांडणारी नवी वाट तिने रुळवली. त्या वाटेचा पांथस्थ होणे, हीच तिला श्रद्धांजली…

श्रद्धांजली प्रतिक्रिया...

कामाला अाकार देणारी व्यक्ती अायुष्यातून गेली : सचिन कुंडलकर
सुमित्रा भावे यांनी मला चित्रपट बनवायचे प्रशिक्षण दिले, या त्रोटक वाक्यात माझे आणि त्यांचे नाते बसू शकत नाही. त्यांनी मला सतरा-अठरा वर्षांचा असल्यापासून सतत लिहिते ठेवले. त्यांची कार्यरत जीवनशैली पाहून मला माझ्या कामाला अपरिमित अशी ऊर्जा सतत मिळत राहिली आहे. ज्यांच्या प्रोत्साहनाने आणि टीकेने माझ्या कामाला सतत आकार मिळत गेला ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून आज गेली.

बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अचंबित करणारे : उमेश कुलकर्णी
सुमित्रा भावे या माझ्या चित्रपट क्षेत्रातील गुरू. त्यांना भेटल्यामुळेच मी चित्रपट या माध्यमाकडे ओढला गेलो. त्यांची तल्लख बुद्धी, त्यांचा निर्भीडपणा, त्यांची ‘नाही’ म्हणण्याची शक्ती, साहित्य, काव्य, नृत्य, समाजशास्त्र यांची जाण, तंत्रज्ञान आणि कलाविषयक प्रवाहांना, नव्या प्रयोगांना समजून घेण्याचा, स्वीकारण्याचा उमदेपणा अशा त्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू अचंबित करणारे होते.

त्यांच्या चित्रपटात व्यावसायिक गणिते कधीच नव्हती : मंगेश जोशी
सुमित्रा भावे यांच्या एका कार्यशाळेमध्ये मी त्यांना खूपच प्रश्न विचारत होतो. हे बघूनच त्यांनी मला नंतर त्यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांनी मला इराणी सिनेमा आणि युरोपियन सिनेमा याच्याविषयी थोडक्यात सांगितलं. आणि त्यानंतर मला काहीतरी घबाड मिळालं असं झालं. त्यांच्या चित्रपटात कुठल्याही प्रकारची व्यावसायिक गणितं कधीच नव्हती.

चित्रपटाचे विश्व खुले करणारी दूत होती : गिरीश कुलकर्णी
चित्रपट नावाची गोष्ट मला सुमित्रा मावशीमुळे समजली. मावशीच्या एका मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा कॅमेरा अनुभवला. ‘जिंदगी जिंदाबाद’ चित्रपटात काम करण्याची संधी मावशीने दिली आणि माझा चित्रपट प्रवास सुरू झाला. मावशी माझ्यासाठी चित्रपटाचे विश्व खुले करणारी दूत होती. चित्रपट कलेचे औपचारिक शिक्षण न घेतलेल्या लोकांना तिने चित्रपट साक्षर केले.

त्यांचे व माझे विचार मिळते जुळते हाेते : डॉ. मोहन आगाशे
‘देवराई’ चित्रपटामध्ये मी पहिल्यांदा सुमित्रा भावे यांच्यासमवेत काम केले. त्यांची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे हे मला जाणवले. त्यांनी एचआयव्ही बाधित, स्किझोफ्रेनिया, नैराश्य आणि स्मृतिभ्रंश अशा सामाजिक विषयांवर चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचे आणि माझे विचार मिळतेजुळते होते. चित्रपट मांडणीच्या त्यांच्या कौशल्यामुळे मी आयुष्यात प्रथमच ‘अस्तू’ या चित्रपटाचा निर्माता झालो.

विचारी, सृजनशील समाजमनाला आपण मुकलो : सतीश आळेकर
सुमित्रा भावे यांच्या जाण्याने स्वातंत्र्योत्तर काळातील चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्रातील एका महत्त्वाच्या विचारी, सृजनशील समाजमनाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सखोल समाजचिंतन, स्त्री जाणिवेचा सुस्पष्ट विचार व त्याविषयीच्या सृजनशील संवेदना यांचा नेमका संगम होता, जो त्यांच्या कलाकृतीत गेली ३०-३५ वर्षे आपण बघत आलो आहोत. एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आज काळाआड गेले.

बातम्या आणखी आहेत...