आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2009 ते 2019पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 89 कोटींनी वाढ झाली, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात देण्यात आली आहे.
मात्र, माझी संपत्ती वाढलेली नाही, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच, माझ्या संपत्तीचे कागदपत्रे तपासून पाहा, असे आव्हानच सुप्रिया सुळेंनी दिले आहे.
खासदारांच्या प्रतिज्ञापत्रानुसारच माहिती
2009 आणि 2019 दरम्यान लोकसभेसाठी पुन्हा निवडून आलेल्या 71 खासदारांची संपत्ती सरासरी 286 टक्केपर्यंत वाढली आहे, असा अहवाल एडीआर संस्थेने जारी केला आहे. खासदारांनी दिलेल्या प्रतीज्ञापत्राच्या आधारावर ही माहिती गोळा केल्याचे संस्थेने म्हटले आहे.
अहवालातील माहिती खरी नाही
अहवालानुसार, सर्वात जास्त 157 कोटींची संपत्ती अकाली दल पक्षाच्या हरसिमरत कौर बादल यांची वाढली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची 89 कोटी रुपये संपत्ती वाढली आहे.
आज याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच सुप्रिया सुळे यांनी अहवालातील ही माहिती खरी नसल्याचे सांगितले. माझी संपत्ती वाढलेली नाही, हवे तर कागदपत्रे तपासून पाहा, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
नेमके काय म्हटले आहे अहवालात?
अहवालानुसार, 2009 मध्ये 71 खासदारांची सरासरी संपत्ती 6.15 कोटी होती, जी 2014 मध्ये वाढून 16.23 कोटी झाली. येत्या पाच वर्षांत म्हणजे 2019 मध्ये ही संपत्ती 17.59 कोटी रु. वाढून 23.75 कोटी झाली. यामध्ये भाजपच्या 43, काँग्रेसच्या 10, तृणमूल काँग्रेसच्या 7, बीजद आण शिवसेनेचे 2-2 खासदार आहेत. दुसरीकडे, जेडीयू, एआयएमआयएम, एआयईयूडीएफ, आययूएमएल, एनसीपी, शिराेमणी अकाली दल आणि नॅशनल कॉन्फरन्सचे एक-एक खासदार आहेत. भाजप खासदारांची संपत्ती सरासरी 15 कोटी रुपयांनी वाढली.
सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
दरम्यान, 7 फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खुप आदर व आपुलकी आहे. माता रमाई यांची ७ फेब्रुवारी रोजी जयंती असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करुन माता रमाई यांचे स्मरण करतात, असे निवेदनात सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.