आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:लोकसभेत 212 प्रश्न, 97 चर्चांमध्ये सहभाग अन् 89% उपस्थितीसह सुप्रिया सुळे देशात अव्वल; धुळ्याचे डॉ. भामरे, डॉ. कोल्हे टॉप फाइव्हमध्ये!

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या पाच जणांमध्ये महाराष्ट्राचे तीन खासदार, पुण्याच्या परिवर्तन संस्थेचा अहवाल

आपल्या मतदारसंघातील जनतेच्या समस्यांसोबतच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या लोकसभेतील पहिल्या पाच खासदारांमध्ये महाराष्ट्रातील तीन खासदारांनी स्थान मिळवले आहे. प्रश्न विचारण्याबरोबरच सभागृहात होणाऱ्या विविध चर्चांमध्ये हिरिरीने सहभाग आणि सर्वाधिक ८९ टक्के उपस्थिती नोंदवून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या पाच खासदारांमध्ये धुळे येथील भाजप खासदार आणि माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे.

पुण्यातील परिवर्तन संस्थेच्या अध्यक्ष अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.

३१ मेपर्यंतची लोकसभेतील आकडेवारी गृहीत धरून त्याआधारे हा अहवाल तयार केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या सुळे यांनी सर्वाधिक २१२ प्रश्न उपस्थित केले. तसेच सभागृहामधील विविध ९७ चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या. त्यांची उपस्थितीही सर्वाधिक म्हणजे ८८.७५ इतकी असल्याचे समोर आले आहे. डॉ. सुभाष भामरे व डॉ. कोल्हे यांनी प्रत्येकी २०२ प्रश्न उपस्थित केले. संसदेत पाऊल टाकल्यापासून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून प्रश्न विचारण्यातही बाजी मारली आहे. या तिघांनंतर भाजपचे मध्य प्रदेशातील मंदसौरचे खासदार सुधीर गुप्ता यांनी १९८ व जमशेदपूरचे बिद्युत महतो यांनी १९५ प्रश्न उपस्थित केले.

शिवसेनेच्या ३ खासदारांचीही उत्तम कामगिरी

महाराष्ट्रातील टॉप फाइव्हमध्ये सुळे, भामरे व डॉ. कोल्हे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर व श्रीरंग बारणे यांनीही स्थान मिळवले आहे. या दोघांनी अनुक्रमे १९५ व १९४ प्रश्न मांडल्याचे अहवालात म्हटले आहे. चर्चांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्यांमध्ये सुळे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे व श्रीरंग बारणे या तिघांनीही स्थान पटकावले आहे.

अहवालाचे निकष असे : संसदेतील उपस्थिती, कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभाग, सभागृहात प्रश्न विचारणे, सभागृहातील चर्चांमध्ये सहभाग (हे निकष डोळ्यासमोर ठेवून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात आला.)

0