आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत वक्तव्याबद्दल माफी मागितली. तर दुसरीकडे आळंदीत संतप्त वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
राजकीय सुडबुद्धीतून विरोध
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, राजकीय सूडबुद्धीतून माझा विरोध करण्यात येत असून यात भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचेच लोक आहेत. कोरोनाकाळात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करणारे आचार्य तुषार भोसले आणि ह.भ.प. गणेश शेटे हेच होते. तेच आता मला विरोध करत असून जे लोक कधीच वारीत पायी चालले नाही, त्या लोकांनी कोरोनाकाळात स्टंट केला होता, असे सांगत सुषमा अंधारेंनी भाजपच्या वारकरी आघाडीवर सडकून टीका केली आहे.
माझे जुने व्हिडीओ व्हायरल
सातत्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असल्यामुळं माझे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. कबीरपंथीय असल्यानं मी कुणाच्याही श्रद्धेच्या आड यायचं नाही, मी कर्मकांड न मानता चैतन्य मानते. तरीदेखील माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजपच्या वारकऱ्यांच्या गटाकडून सूडबुद्धीनं विरोध केला जात असल्याची टीका अंधारेंनी केली आहे.
वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये
माझ्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांनी माझी प्रतीकात्मक अंतयात्रा काढली. या देशात अनेक सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आलेल्या असून माझी भाजपच्या वारकऱ्यांनी दखल घेतल्याबद्दल आनंदी असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. याशिवाय वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी वारकरी आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.
संजय राऊत यांच्याकडून सुषमा अंधारे यांची पाठराखण
शिवसेना नेता सुषमा अंधारे यांना वारकरी संप्रदायाचे संबंधित केलेल्या वक्तव्यावरून टीका होत असताना खासदार संजय राऊत हे उघडपणे बचावासाठी उतरले असून त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालाविरोधामध्ये संबंधित व्यक्ती का बोलत नाही असा प्रश्न वारकरी संप्रदायातील नेत्यांना केला. येथे वाचा सविस्तर
नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली त्यामुळं त्यांना माऊली म्हटलं गेलं. परंतु माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर माझ्या आईनं 15 एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं, ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असायला हवी, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं होतं.
प्रतिकात्मक अंतयात्रा काढली!
सुषमा अंधारेंवर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. आळंदी येथील वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत त्यांना चपलेचा हार घालत निषेध केला. आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. सुषमा अंधारेंच्या प्रतिमेस चपलांचा हार घालत वारकऱ्यांकडून त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यात आलं.
संतांबाबत आधी अभ्यास करा - मडके
संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा, असा सल्लाही वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंन दिला आहे, तसेच वारकरी संप्रदाय हा जातपात न मानणारा असून साधुसंतांनी समानतेचा आणि एकीचा पाया रचल्याचं देखील वारकरी संप्रदायाच्या अनुयायांचं म्हणणं आहे. वारकरी संप्रदायाला छेडण्याचे काम सुषमा अंधारेंनी केले ते त्यांनी करु नये असे आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके यांनी सल्ला दिला.
अंधारे यांचा पक्षाने राजीनामा घ्यावा
वारकरी संप्रदाय हा जातपात मानणारा संप्रदाय नाही. साधुसंतांनी सर्वांना समानतेचा आणि एकतेचा संदेश दिलेला आहे. त्यामुळं सुषमा अंधारेंनी संतांबद्दल बोलताना अभ्यास करून बोलावं, असंही आंदोलक कीर्तनकार महेश मडके म्हणाले. याशिवाय वारकरी संप्रदायाबाबत असे विचार ठेवणाऱ्या सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.