आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून मदत:एकनाथ शिंदेंनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची घेतली भेट, शिवसेनेने 10 लाखांची केली मदत; बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकरने नैराश्यात आत्महत्या केली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आज शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यासोबतच स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याच बरोबर स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'राज्यातील प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरच सुरू केल्या जातील, एमपीएससीचा कारभार पारदर्शक असायला हवा असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येची गंभीर दखल घेतली आहे. एकूण 15 हजार 500 पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केलेला आहे. यासोबतच त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या कार्यवाहीला देखील सुरुवात झाली असल्याची माहिती शिंदेंनी दिली.

स्वप्नीलने का केली होती आत्महत्या?
एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही. परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज अशा अनेक कारणामुळे स्वप्नील तणावात होता. मात्र अखेर त्याचा संयम सुटला आणि त्याने आपले जीवन संपवले.