आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर महिला तलाठ्यास पाच वर्षे सक्तमजुरी:जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी घेतली होती दीड हजारांची लाच

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागेल असे लाचलुचपत प्रतिबंध न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

सीमा सुभाष कांबळे (वय 37, रा. शिरवळ, जि. सातारा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. 16 नोव्हेंबर 2015 रोजी कांबळे यांना राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. तक्रारदार यांनी सारोळे येथील तीन गुंठे जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी त्यांनी तत्कालीन तलाठी कांबळे यांकडे अर्ज केला होती. नोंद करण्यासाठी कांबळे यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली. त्यानंतर, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करून कांबळे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पुणे युनिटचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी सहा साक्षीदार तपासले. तक्रारदाराचे काम आरोपीकडे प्रलंबित होते तसेच आरोपीकडून तक्रारदाराचे कामासंबंधीचे कागदपत्रे हस्तगत केल्याचे दाखवून दिले. तसेच, तक्रारदार व आरोपीमध्ये लाचेच्या संदर्भात झालेले बोलणे ध्वनिमुद्रित झाल्याचे व त्यामध्ये आरोपीचा व तक्रारदाराचा आवाज असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. अगरवाल यांनी केला. पैरवी पोलिस नाईक जगदीश कस्तुरे व पोलिस हवालदार अतुल फरांदे यांनी सरकार पक्षाला न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

लाचेची रक्कम जप्त करण्यात आली नाही :

कांबळे यांनी लाच मागितली नाही. तसेच, लाचेची रक्कम स्वीकारली नसून ती जप्तही करण्यात आलेली नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. परंतु, उपलब्ध कागदपत्रे व पुराव्यांच्या आधारे ॲड. अगरवाल यांनी आरोपीचा बचाव खोटा असल्याचे न्यायालयात सिद्ध केले.

बातम्या आणखी आहेत...