आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याचा साथीदार आफताब हुसेन शाह (२८, रा. किश्तवार, जम्मू आणि काश्मीर) याला काश्मिरात अटक करण्यात आली होती. दोघांना विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने जुनैद यास ७ जून तर आफताब यास १४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जुनैद याच्या पोलिस तपासात त्याच्याकडे १५ सोशल मीडिया खाती, ७ चॅटिंग खाती आणि ११ सिमकार्ड सापडले. या खात्यात हजारो लोक सहभागी असून त्यांच्याकडेही चौकशी करायची असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. शाह हा जुनैद आणि लष्कर-ए-तोयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगिल, गंदरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोधमोहीम राबवली. या तपास पथकाने श्रीनगरपासून २९१ किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्तवार या ठिकाणी आफताबला अटक केली. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले.
देशविरोधी कृत्यात दोन्ही आरोपींचा आहे सहभाग
एटीएसच्या तपासात दोन्ही आरोपी लष्कर-ए-तोयबा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करणे, त्यासाठी आर्थिक पुरवठा करणे, दारूगोळा व शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणे अशा गोष्टी करत असल्याचे समोर आले आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतातील मर्मस्थळांची, संरक्षण दल तसेच देशातील इतरही महत्त्वाच्या ठिकाणांसंदर्भातील रेकी त्यांनी केली आहे. जुनैद महंमद या आरोपीच्या घर झडतीत गडद हिरव्या रंगाचा प्रशिक्षणाकरिता वापरण्याचा शर्ट आढळला आहे. त्याबाबत अधिक तपास करणे आहे. आरोपी हे भारतातील गर्दीच्या ठिकाणी घातपात व दहशतवादी कृत्ये करणार असल्याचे स्पष्ट झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.