आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी घोटाळा नेमका काय?:तब्बल 7500 जणांच्या गुणांत फेरफार; अब्दुल सत्तार प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास पोलिसांचा नकार

मंगेश फल्ले। पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य परीक्षा परिषदेअंर्तगत राज्यातील शिक्षकांसाठी बंधनकारक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ( टीईटी) गैरव्यवहार करून ७ हजार ८०० अपात्र विद्यार्थी पात्र करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. २०१९मध्ये झालेल्या या परीक्षेत एकूण १६ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

टीईटी परीक्षेस विद्यार्थी अनुपस्थित,अपात्र असतानाही त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना यापुढे कायमस्वरुपी परीक्षा बंदी करण्यात आली आहे. याच प्रकरणात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर शेख व उझमा नहीद शेख या दोन मुली व एका मुलाचा उमेदवारांच्या अपात्र यादीत समावेश असल्याचे निष्पन्न झाले. या यादीतील उमेदवारांनी अपात्र असूनही पात्र होण्यासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. सत्तारांच्या मुलांचा या यादीत समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

गुणांत फेरफार

२०१९च्या टीईटी परीक्षेत ७५०० उमेदवारांच्या गुणात फेराफार करुन अपात्र असतानादेखील अंतिम निकालात या उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना टीईटी परीक्षेस कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांपैकी २९३ उमेदवारांना अंतिम परीक्षेत अपात्र असतानाही प्रमापत्र वाटप करण्यात आल्याची बाबही निष्पन्न झाली. त्यामुळे सदर कालावधीत प्रदान करण्यात आलेले प्रमाणपत्र कायदेशीर नसल्याचे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. पुणे सायबर पोलीसांनी एकूण ८७ उमेदवार आरोपींकडे केलेल्या तपासात ७६ उमेदवार अंतिम निकालात अपात्र असल्याचे आणि तीन उमेदवार परीक्षेस अनुपस्थित असल्याचेही उघडकीस आले आहे.

शिक्षण विभागापर्यंत धागेदोरे

२००९ मध्ये आरटीई कायदा झाल्यानंतर राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे बंधनकारक करण्यात आले. तसेच अपात्र शिक्षकांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राज्यात प्रथम २०१३ मध्ये टीईटीची परीक्षा पार पडली. पहिली ते पाचवी इयत्तेसाठी शिक्षक पदाकरिता १५० गुणांची टीईटी क्रमांक एकची परीक्षा द्यावी लागते. तर सहावी ते ैआठवी वर्गाकरिता टीईटी क्रमांक दोनची परीक्षा देता येते. याकरिता डीएड, पदवीधारक पात्रता आहे. त्याचप्रमाणे ९वी ते १२वी वर्गाकरिता बी. एड झालेल्यांना अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षा द्यावी लागते. मात्र, सन २०१८ आणि २०१९ च्या टीईटी परीक्षेत पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला आणि याप्रकरणी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हयांतील शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे पडताळणीचा निर्णय घेतला.

पोलिसांनी बाळगले मौन

राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी मंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जातात. त्यांच्या मुलींची नावे टीईटी अपात्रेच्या यादीत समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी यासंर्दभात प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. चार महिन्यांपूर्वीच आम्ही संबंधित परीक्षेतील अपात्र उमेदवारांची यादी राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवली होती व त्या दोषींवर कारवाई करावी, असे सूचित केले होते. त्याप्रमाणे राज्य परीक्षा परिषदेने याप्रकरणी संबंधित अपात्र उमेदवारांची नावे जाहीर करुन त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दोषींना सेवेतून कमी करणार

राज्य परिक्षा परिषदेचे अधीक्षक शशीकांत चिमणे यांनी सांगितले की, शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत पुणे सायबर पोलिसांनी सखोल तपास केला आहे. त्यांनी राज्य परीक्षा परिषदेस एकूण ७८८० नावांची यादी दिली आहे. या यादीची तपासणी केली असता त्यातील ६ नावे दुबार आढळल्याने एकूण ७, ८७४ जणांवर कायमस्वरुपी परीक्षा बंदीची कडक कारवाई करण्यात आली आहे. यादीत अपात्र असून शिक्षक सेवेत कार्यरत असलेल्या दोषी शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली जाणार आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावेही सदर यादीत आहे. टीईटी २०१९च्या परीक्षेप्रमाणेच २०१८ च्या टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले असून त्यातील १७०१ उमेदवारांवरही लवकरच कडक कारवाई करण्यात येईल.

7 हजार अपात्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, मार्च २०१९ च्या टीईटी परीक्षेचा निकाल मार्च २०२० मध्ये लागला. या परीक्षेत १६ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. २०२१ मध्ये टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार पोलिस तपासात उघडकीस आला आणि सात हजार ८८० अपात्र उमेदवारांची यादी निष्पन्न झाली. त्यांना कायमस्वरुपी परीक्षेस बंदी घालण्यात आली. पुणे सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी २९३ जणांना बनावट प्रमाणपत्र वितरित केल्याचे उघड झाले. अपात्र विद्यार्थ्याची यादी जाहीर करण्यात आली ती कोणाची मुले आहे हे पाहिलेले नाही. जे शिक्षक सेवेत आहेत त्यांचा शोध घेऊन शिक्षण संचालक त्यांच्यावर पुढील कारवाई करतील.

बातम्या आणखी आहेत...