आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी परीक्षा गैरव्यवहार:गुण वाढवण्यासाठी सावरीकर याने अश्विनकुमारला दिले पाच कोटी, 2017 मध्ये नवी दिल्लीत शिजला कट

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रकरणात “बडे मासे’ पोलिसांच्या जाळ्यात आले आणि खळबळ उडाली. टीईटी २०१८ च्या परीक्षेत परीक्षा आयोजन करणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार शिवकुमार याला परीक्षेत ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढवण्यासाठी, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याने सुमारे पाच कोटी रुपये दिल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. सावरीकर यास प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एम.शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणावर व गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोपीकडे सखोल तपास करणे आहे. या गुन्ह्यात आरोपी सौरभ त्रिपाठी, अभिषेक सावरीकर व डॉ प्रीतीश देशमुख यांच्यामध्ये टीईटी परीक्षेमध्ये अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याबाबत डिसेंबर २०१७ मध्ये दिल्ली येथे एक बैठक झाली. बैठकीत टीईटी २०१८ या परीक्षेतील अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना परीक्षेमध्ये पात्र करण्याची योजना तयार केली. अश्विनकुमार याला सावरीकर याने दिलेले ५ कोटी रुपये नेमके कोणत्या परीक्षार्थींनी दिले याबाबतची परीक्षार्थींची नावे, पत्ता व मोबाइल नंबरबाबत आरोपीकडे सखोल तपास करावयाचा आहे. परीक्षेमध्ये मार्क वाढवण्यासाठी सुमारे ७०० परीक्षार्थीं सावरीकर याच्या संपर्कात कोणकोणत्या एजंटच्या माध्यमातून आले, त्या एजंटची माहिती गोळा करावयाची आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबतही पोलिसांना चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अजय वाघमारे हे करत आहेत. या प्रकरणात आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

गणेशनला मिळाले दोन कोटी रुपये
टीईटी २०१८ च्या परीक्षेत अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी सावरीकर याने अश्विनकुमार यास पाच कोटी रुपये दिले होते. अश्विनकुमार याने त्यापैकी दोन कोटी रुपये जी. ए. सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीचा संस्थापक गणेशन यास दिले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना आरोपीने २० लाख रुपये दिले, तर राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना ३० लाख रुपये अश्विनकुमारने दिल्याचे पोलिस तपासात सांगितले आहे. अश्विनकुमार याने हिरे, सोने-चांदीचे दागिने खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या घरातून ६८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, १६ लाख ७५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने, १७ लाख १२ हजार रुपयांचे हिऱ्यांचे दागिने असे एकूण एक कोटी एक लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

८१ शिक्षकांची नोकरी धोक्यात
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी निखिल कदम याने टीईटी २०१८ मधील परीक्षेत ५६ परीक्षार्थींचे मार्क वाढवण्यासाठी प्रत्येकी ४० हजार रुपये गोळा करून ते संबंधित परीक्षा घेणाऱ्या जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार यास दिल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, टीईटी २०१८ च्या परीक्षेतील ८१ बनावट प्रमाणपत्रे पुणे सायबर पोलिसांना सादर केलेली आहेत. त्यामुळे या ८१ शिक्षकांची नोकरी आता धोक्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...