आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात पुणे सायबर पोलिसांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी सुशील खोडवेकर यास अटक केल्याने खळबळ उडाली आहे. थेट आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने आयएएस लाॅबीचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी आता आयपीएस अधिकाऱ्यांवर दबाव वाढवत या प्रकरणाचा तपास लांबवू नये, असा प्रयत्न करत खोडवेकर याच्या बचावाचे प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटक्के यांना मुंबईत मंगळवारी बाेलावून घेत या प्रकरणाचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुशील खोडवेकर यास पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात त्याने सीआरपीसी १९७ नुसार मी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असल्याने अटकेपासून संरक्षण असल्याचे सांगत अटकेच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात बचाव पक्षाचे वकील अमाेल डांगे यांनीही न्यायालयात खोडवेकर याची बाजू मांडताना काेणत्याही प्रकारची नाेटीस खोडवेकर यांना न देता थेट अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पाेलीसांनी खोडवेकर याच्या जामीन अर्जास विराेध करताना न्यायालयात लेखी म्हणणे सादर करून आराेपी विराेधात सकृतदर्शनी थेट पुरावे मिळालेले असून या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आराेपींच्या जबाबात त्याच्या विराेधात पुरावे असल्याचे सांगितले.
तुकाराम सुपे याला खात्यांतर्गत सुरू असलेल्या चाैकशीतून क्लीनचीट देण्यासाेबतच साैम्य प्रकारची कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचसाेबत काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीला पुन्हा बाहेर काढून परीक्षा भरतीचे कंत्राट मिळवून देण्यात सक्रिय सहभाग त्याने घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याकामी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर, डाॅ.प्रितीश देशमुख व मनोज डोंगरे यांच्याकडून त्याने लाखाे रुपये घेल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
जामीन अर्जावर सुनावणी बाकी
आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यास पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दाेन दिवसांची पोलिस काेठडी सुनावण्यात आली. परंतु साेमवारी त्यास काेराेनाची लक्षणे दिसून आल्याने चाचणी केली असता त्याचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे त्यास उपचाराकरिता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याचा उर्वरित पोलिस काेठडीचा हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन काेठडी देण्यात यावी, अशी मागणी केली व ती न्यायालयाने मंजूर केली. मात्र, त्याच्या जामीन अर्जावर दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद हाेऊनही मंगळवारी यासंर्दभात न्यायालयात आदेश हाेऊ शकलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.