आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हाडा भरती परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यात प्रमुख आरोपी असलेला जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याने गेल्या तीन ते चार वर्षांत गैरव्यवहार केलेल्या पैशातून वर्धा येथे मोक्याच्या जागी ९ एकर शेतजमीन तसेच मर्सिडीझ ही आलिशान कार खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत खातरजमा करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक नुकतेच देशमुख याला घेऊन वर्धा येथे गेले होते.
डॉ. प्रीतीश देशमुख याने वर्ध्यात गैरव्यवहारातून प्राप्त झालेल्या पैशातून १८ ते २० लाख रुपये एकर दराने नऊ एकर शेतजमीन विकत घेतली आहे, अशी माहिती तपास पथकांना मिळाली आहे. याबाबत वर्धा येथील रजिस्टर ऑफिस येथे पोलिस संबंधित जमिनीची कागदपत्रे तपासून पाहत आहेत. तपासादरम्यान सदर जमीन गैरव्यवहारातील पैशातून विकत घेतल्याचे निष्पन्न झाल्यास सदर जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याच्या माहितीस पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
त्याचप्रमाणे देशमुख याने विकत घेतलेल्या आलिशान कारबाबतही पोलिस तपास करत असून संबंधित कारही जप्त केली जाईल. डॉ. देशमुखचे नुकतेच नाेंदणी पद्धतीने नागपूर येथील एका डॉक्टर तरुणीसोबत लग्न झाले होते. २९ डिसेंबर रोजी वर्धा येथे त्याच्या लग्नाचे रिसेप्शन होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आणि तो जेरबंद झाल्याने संबंधित कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की कुटुंबावर आली.
मंत्र्यांचा हस्तकापर्यंत धागेदोरे
म्हाडा भरती परीक्षेच्या पेपरफुटीचा प्रकार पुणे सायबर पाेलिसांनी परीक्षेपूर्वीच आदल्या रात्री उघडकीस आणला आणि मध्यरात्रीत परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. सदर तपासात अटक करण्यात आलेल्या आराेपींची चाैकशी व पुराव्यातून राज्यातील एका नामांकित मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत धागेदाेरे पाेहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडाच्या अ, ब, क वर्गातील पदांच्या परीक्षेचे पेपर घेण्याची जबाबदारी जीए साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. या कंपनीकडे हाेती. मात्र, कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतीश देशमुख यानेच पेपरफुटीचा प्रकार एजंटच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यास पाेलिसांनी पाठलाग करत रंगेहाथ जेरबंद केले. याप्रकरणी पाेलिस अजूनही सखोल तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदार होण्याचे स्वप्न अधुरे
डाॅ. प्रीतीश देशमुख हा मूळचा वर्ध्याचा रहिवासी आहे. त्याचे एमबीबीएसपर्यंत शिक्षण झाले. मात्र, डाॅक्टरकी न करता ताे मंत्रालयात मध्यस्थाची कामे करत वेगवेगळ्या खात्यात फेऱ्या मारत असे. मूळच्या बंगळुरूच्या जी.ए. टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीला त्याने वेगवेगळे कंत्राट मिळवून दिल्याने त्याला महाराष्ट्राच्या संचालकपदावर बसवण्यात आले हाेते. म्हाडा परीक्षेच्या पेपरची जबाबदारी देशमुख याच्यावर हाेती, परंतु अल्पावधीत काेट्यवधी रुपये मिळवण्यासाठी त्याने एजंटमार्फत पेपर फाेडून त्याची विक्री केली. माेठ्या प्रमाणात पैसे गाेळा करून वर्धा येथून २०२९ ची आमदारकीची निवडणूक लढण्याचे त्याचे स्वप्न हाेते. मात्र, त्याचा भंडाफाेड झाल्याने त्याचे मनसुबे उधळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.