आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) परीक्षार्थींकडून एजंटामार्फत पैसे स्वीकारून परीक्षा घेणाऱ्या जी.ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीचे आजी-माजी संचालक तसेच राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी गैरव्यवहार केल्याची बाब उघडकीस आली आहे. मात्र, आता बंगळुरू येथील जी.ए. साॅफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन पाेलिसांच्या रडारवर आला असून त्याला चाैकशीकरिता हजर राहण्यासाठी पाेलिसांनी नाेटीस बजावली आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कंपनीचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची बाब पाेलिसांनी न्यायालयात सांगितली. राज्य परीक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष सुखदेव ढेरे याच्या घरझडतीत दाेन लाख ९० हजार रुपये मिळून आले आहेत. मूळचा बारामती येथील रहिवासी आणि सध्या पिंपरीतील काळेवाडी परिसरात राहणारा निखिल कदम याच्या चाैकशीदरम्यान पाेलिसांना कदमच्या माेबाइलमधून जी. ए. साॅफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक अश्विनकुमारला पाठवलेले ईमेल मिळाले आहेत. कदम याने अश्विनकुमार याला ५६ परीक्षार्थींची यादी दिली आणि त्यांच्याकडून प्रत्येकी ४० हजार रुपये घेतल्याचे सांगितले. जी.ए. साॅफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी शेखर मस्तूद याच्या मदतीने अश्विनकुमारने टीईटी परीक्षेतील ७०० परीक्षार्थींचे गुण बदलून ती माहिती टीईटी २०१८ या मेन सर्व्हरवर अपलाेड करून घेतल्याची बाब तपासात उघडकीस आली आहे. या ७०० परीक्षार्थींचे राेल नंबर व गुण असलेली यादी पेनड्राइव्हमधून अश्विनकुमारला दिली असून हा पेनड्राइव्ह पाेलिसांना जप्त करावयाचा आहे.
आयाेग नेमून चाैकशीची मागणी
राज्यातील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार २०१३ पासून टीईटी परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. राज्यात शिक्षक भरतीला बंदी असतानाही आर्थिक गैरव्यवहार करून हजाराे शिक्षकांची भरती करण्यात आली. विनाअनुदानितवरून अनुदानितवर नेमणुका देत असाच भ्रष्टाचार केला गेला. या शिक्षक भरती घाेटाळ्याची चाैकशी न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार पाहता २०१२ ते २०२१ यादरम्यानच्या भरती झालेल्या सर्व शिक्षकांच्या नेमणुका तपासण्याची गरज असल्याचे सदर निवेदनात सांगण्यात आले.
मोबाइल चॅटिंग पोलिसांच्या हाती
पुणे | शिक्षक परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंचा चालक सुनील घोलप आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार मुख्य आरोपी अभिषेक सावरीकर यांच्यात टीईटी परीक्षेसंदर्भात झालेले मोबाइलवरील चॅटिंग पोलिसांच्या हातात लागले आहे. या चॅटिंगमध्ये परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत बोलणे झाल्याचे उघड झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.