आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे आणि त्याच्या साथीदारांनी परिषदेच्या कार्यालयात बसून शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) ८०० अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवले. त्यासाठी कार्यालयातील संगणकांचा वापर करण्यात आला. या सर्वांकडून त्यांना एजंटमार्फत आधीच पैसे मिळाले होते. त्यानंतर या अपात्र परीक्षार्थींचीच यादी राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर टाकण्यात आली. पुणे पोलिसांच्या तपासात सुपे आणि त्याच्या टोळक्याचे एकेक कारनामे उघड होत आहेत. एकट्या टीईटी २०२० या परीक्षेतूनच सुपे - देशमुख यांच्या टोळक्याने सुमारे ४ कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुपेकडे आलेली परीक्षार्थींची नावे, हॉल तिकिटांची यादी तो आपला वाहनचालक सुनील घोलपच्या मोबाइलवर पाठवायचा. त्यानंतर घोलप ती यादी परीक्षेचे आयोजन करणारी कंपनी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ.प्रीतीश देशमुखला पाठवायचा. हा सर्व व्यवहार मोबाइल सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होता. देशमुख याने आपले दोन एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना हाताशी धरून औरंगाबाद, जालना, नाशिक, बुलडाणा, जळगाव, मुंबई, पुणे आदी विविध ठिकाणी एजंट नेमले. त्याशिवाय करिअर कोचिंग क्लास चालक यांच्याशी संपर्क साधून पेपर फोडले. परीक्षेपूर्वीच तुम्हाला प्रश्नपत्रिका हातात मिळेल, असे आमिष हे क्लासचालक परीक्षार्थींना दाखवत किंवा नंतरही गुण वाढवले जात. एकट्या टीईटी २०२० परीक्षेत ८०० अपात्र परीक्षार्थींकडून सुपे-देशमुख टोळक्याने सुमारे ४ कोटी रुपये कमावल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. संस्थाचालक, क्लासचालकांमार्फत कमावलेल्या पैशांचा काही वाटा शासकीय अधिकाऱ्यांकडेही पोहोचता केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे.
६ जानेवारीपर्यंत कोठडी वाढवली : टीईटी परीक्षा घाेटाळ्यातील आराेपी डाॅ.प्रीतीश देशमुख, संताेष हरकळ, अंकुश हरकळ, औरंगाबादचे क्लासचालक अंकित चनखाेरे, कृष्णा जाधव, अजय चव्हाण यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.एस.डाेलारे यांच्या न्यायालयात हजर केले. या वेळी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने ६ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गायकवाड, लिंघोटेची कोठडी वाढवली
आराेग्य भरती गट ‘क’ परीक्षेतील अमरावती येथून अटक करण्यात आलेले आराेपी निषाद गायकवाड, राहुल लिंघाेटे यांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्याही पाेलिस काेठडीत ६ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. दिल्लीतील एजंट आशुताेष शर्मा याच्या मदतीने त्यांनी १५ ते १८ उमेदवार व एजंटांना परीक्षेचा पेपर पुरवल्याची बाब उघडकीस आली आहे.
आैरंगाबादचे क्लासचालक सक्रिय
संतोष व अंकुश हरकळ यांनी आैरंगाबादचा क्लासचालक अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखाेरेशी संपर्क साधला होता. टीईटी २०२० मधील अपात्र परीक्षार्थी तसेच खासगी क्लासचालक, शिक्षण संस्थांसाेबत त्यांनी संपर्क साधून आर्थिक गैरव्यवहार केला. आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटी परीक्षेतील आपल्या ओळखीच्या परीक्षार्थींची शैक्षणिक कागदपत्रे, हाॅल तिकिटे या क्लासचालकांनी स्वत:कडे ठेवून घेतली, असे तपासात उघड झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.