आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी घोटाळा:तुकाराम सुपेचा ड्रायव्हर पाठवायचा इतर आरोपींना विद्यार्थ्यांची नावे; हॉलतिकीट, ड्रायव्हरसह आणखी एक जण अटकेत

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे याच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलप यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली. सुपे याने पाठवलेली विद्यार्थ्यांची नावे व हॉलतिकीट अन्य आरोपींना पाठवण्याचे काम घोलप करत असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने आरोपींना ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. जाधव म्हणाले, सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या घोलप याने २०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आहेत. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉलतिकीट घोलप याच्या व्हॉट्सअॅपवर पाठवत होता. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे घोलप याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉट्सअॅप चॅटिंगबाबत पुरावा हस्तगत करायचा आहे. घोलप याने स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठवली आहेत. तर, डोंगरे हा सुपे व सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता. या प्रकरणात त्याला तीन लाख पंचवीस हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली.

सुपे, सावरीकर यांचा मुक्काम येरवडा कारागृहात
पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करताना सरकारी वकील विजयसिंह जाधव म्हणाले, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले मोबाइल, लॅपटॉप यांचे तांत्रिक विश्लेषण करून डिजिटल पुरावा मिळवायचा आहे. आरोपींविरोधात आणखी पुरावे मिळवून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सुपे व सावरीकर याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यामुळे यापुढे सुपे व सावरीकर यांचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...