आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी भरती 2018 गैरव्यवहार:साडेतीनशे परीक्षार्थींकडून ४ कोटी रुपयांची वसुली; बीड येथूनही एक ताब्यात, कोरोनामुळे अटक लांबली

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकचा टेक्निशियन, चाळीसगावचा शिक्षक अटकेत

सन २०१९ पाठोपाठ आता सन २०१८ च्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) कोट्यवधींचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी नाशिक येथून आराेग्य विभागातील एक टेक्निशयन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला जेरबंद केले आहे. दाेघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून सुमारे तीन काेटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आराेपींना दिल्याची बाब तपासात समाेर आली आहे.

याप्रकरणी सुरंजित गुलाब पाटील (रा.तपाेवन, नाशिक) आणि स्वप्निल तीरसिंग पाटील (रा.चाळीसगाव, जळगाव) यांना अटक केली. त्यांना प्रथमवर्ग न्यायलयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी श्रद्धा डाेलारे यांनी दाेघांना १३ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर, बीड येथून ताब्यात घेण्यात आलेला संशयित आराेपी विजय नागरगाेजे हा आजारी असल्याने काेराेना चाचणी केल्यानंतरच त्यास अटक केली जाणार आहे.

नाशिकचा सुरंजित पाटील हा आराेग्य विभागात टेक्निशियनचे काम करतो. तो टीईटी गुन्ह्यातील डाॅ.देशमुख याचे दोन एजंट संताेष हरकळ (रा.औरंगाबाद) आणि अंकुश हरकळ (रा.बुलडाणा) यांच्या संपर्कात हाेता. सन २०१८-१९च्या टीईटी परीक्षेस बसलेल्या २०० परीक्षार्थींकडून त्याने प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये असे एकूण दाेन काेटी ३५ लाख रुपये गाेळा करून मुख्य आराेपी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संचालक तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर, डाॅ.प्रीतीश देशमुख यांना देण्याकरिता हरकळ यांच्याकडे दिले. त्याचप्रमाणे आराेपी स्वप्निल पाटील यानेही १५० परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये असे दीड काेटी रुपये एजंटमार्फत आराेपींना दिल्याचे तपासात समाेर आले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १२ आराेपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चार काेटी ६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयासमोर केला.

आराेपींनी २०१८-१९ च्या टीईटी परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी नियाेजित कट रचल्याचे उघडकीस आले आहे. सुरंजित पाटील व स्वप्निल पाटील यांचे माेबाइल पाेलिसांनी जप्त केले असून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून आणखी पुरावे हस्तगत केले जाणार आहेत. आराेपींनी एजंटला दिलेली रक्कम कुठे आहे, आराेपींना ही रक्कम दिल्याने नेमका काेणत्या प्रकारचा फायदा झालेला आहे, त्यांना किती वाटा मिळाला ताे हस्तगत करणे आहे, या गुन्ह्यात इतर कुणी शासकीय कर्मचारी सहभागी आहेत का, याबाबत पाेलिसांना सखाेल तपास करावयाचा आहे. तुकाराम सुपे यांचा चालक सुनील घाेलप आणि एजंट डाेंगरे यांचे सुपे, देशमुख व सावरीकर यांच्यासाेबत बरेच चॅटिंग झाल्याचे तांत्रिक विश्लेषणातून समाेर आले आहे. सुपे व घाेलप यांनी मिळून अनेक परीक्षार्थींची जमवाजमव केल्याचे आणि बऱ्याच प्रमाणात परीक्षार्थींंकडून पैसे उकळल्याचे निष्पन्न हाेत असून त्या दृष्टीने तपास करावयाचा आहे. डाॅ.प्रीतीश देशमुखकडून डाेंगरे याने काही रक्कम स्वीकारल्याची बाब उघड झाली आहे. ही रक्कम कशासाठी स्वीकारली गेली, किती रक्कम स्वीकारण्यात आली, कुणाकरिता रक्कम पुरवण्यात आली, इतर काेण साथीदार सहभागी आहेत, यासंदर्भात पाेलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, नाशिक-जळगाव जिल्ह्यातील आरोपींसाेबतच गुरुवारी जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीचा संचालक डाॅ.प्रीतिश देशमुख, एजंट संताेष हरकळ, सुनील घाेलप, मनाेज डाेंगरे यांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांची पाेलिस काेठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमाेर हजर केले असता घाेलप, डाेंगरेला ११ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. ही कामगिरी पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पाेलिस आयुक्त रामनाथ पाेकळे, सायबर पाेलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहा.पाे.आयु. विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके, पाेलिस निरीक्षक कुमार घाडगे, पीएसआय रवींद्र गवारी, पीएसआय अनिल डफळ, सचिन वाजे, नितेश शेलार, रवींद्र साळवे, नितीन चांदणे, अश्विन कुमकर, साेनुने यांनी केली आहे.

टीईटीत २ ते ३ वेळा खाेटा निकाल?
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेणारी कंपनी जी.ए.चा संचालक डाॅ.प्रीतिश देशमुख याने संताेष व अंकुश हरकळ या एजंटच्या मदतीने परीक्षेत गैरव्यवहार करण्यासाठी विद्यार्थ्यांची जमवाजमव केली. पैसे घेऊन अपात्र परीक्षार्थींना पात्र झाल्याबाबत बनावट निकाल शिक्षण परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर २ ते ३ वेळा प्रकाशित केले असल्याची बाब पाेलिस चाैकशीत समाेर आली आहे. या दृष्टीने या अपात्र विद्यार्थ्यांची नावे व पत्ते शाेधून त्यांच्याकडे अधिक तपास करून पुरावे प्राप्त करावयाचे असल्याचे तपास अधिकारी पाेलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी न्यायालयास सांगितले.

‘त्या’ अटकेबाबत मात्र स्थानिक नागरिक अनभिज्ञ
तपोवन - काठेगल्ली लिंक रोड परिसरातील उत्तरानगर येथील श्री गणेश ब्लिस इमारतीत सुरंजित पाटील राहत असल्याचे समोर आले आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याबाबत पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्याबाबत मात्र स्थानिक नागरिक अनभिज्ञ होते. तसेच पाटील हा डॉक्टर असल्याची चर्चाही परिसरातील नागरिकांत होती. टीईटी परीक्षा घोटाळ्यात नाशिक कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

टीईटी २०२० मध्ये ४ काेटींची फसवणूक : शिक्षक पात्रता परीक्षेतील आराेपींनी सन २०१९ मधील जाहिरातीनुसार जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या आॅगस्ट २०२० मधील निकालातही घाेटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात अपात्र असलेल्या सुमारे ८०० परीक्षार्थींकडून चार काेटी २० लाख रुपये स्वीकारून राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर बनावट निकाल प्रसिद्ध करण्यात आला. यात परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याने एक काेटी ७० लाख रुपये, शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याने सव्वा काेटी तर परीक्षा आयाेजन करणाऱ्या जी.ए. कंपनीचा संचालक डाॅ. देशमुखने सव्वा काेटी रुपये आपसात वाटून घेतल्याचे निष्पन्न झालेे आहे.

५ आरोपी, पोलिस उपायुक्तांसह ५ पोलिसांना कोरोना
आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी घोटाळ्यातील आरोपी निलंबित आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए.कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार, आशुताेष शर्मा, निशिद गायकवाड, राहुल लिंघाेट यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले इतर आराेपी व पाेलिस कर्मचाऱ्यांनाही काेराेनाची लागण झाली आहे. यात सायबर गुन्हे शाखेच्या पाेलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह पाच पाेलिस कर्मचारी काेराेनाबाधित झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...