आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी गैरव्यवहार प्रकरण:बोगस शिक्षकांनी माफीचे साक्षीदार व्हावे; अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाणार

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पैसे देऊन नोकरी मिळवणारे 7,880 जण कारवाईच्या फेऱ्यात

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी सर्व पाळेमुळे खोदून काढली आहेत. पैसे देऊन पास होऊन नोकरी मिळवलेले ७ हजार ८८० जण आता कारवाईच्या फेऱ्यात आले आहेत. त्यांच्याकडे आता माफीचे साक्षीदार व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असेच पर्याय उरले असल्याची माहिती पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान, ऑनलाइन परीक्षेचे पेपर कसे फोडावे याच्या विविध पद्धतींबाबत प्रशिक्षण देणारे सेंटर बिहार येथील पटना येथे असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा प्रकरणात तब्बल साडेतीन लाख पेपरची छाननी केली आहे. यात ओएमआर शिटवर काही ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे कोरी ठेवणे, थेट यादीमध्ये नावे घालणे, शेवटच्या पात्र अपात्रच्या यादीमध्ये थेट पास दाखवणे अशा शक्यता तपासून साडेतीन लाख परीक्षार्थींचे पेपर तपासण्यात आले. त्यातून गैरमार्गाने पास झालेल्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली आहे.

शालेय शिक्षण विभागातील तत्कालीन आधिकारी, दलालांशी संगनमत करून अपात्र उमेदवार पात्र ठरले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात उच्चपदस्थ आधिकाऱ्यांसह दलालांना अटक करण्यात आली आहे. मात्र, गैरप्रकार करून पात्र ठरलेल्या उमेदवारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. याच धर्तीवर कमी कालावधीत कोट्यवधींची माया कमवणाऱ्या मोठ्या माशांना योग्य शासन होण्याच्या दृष्टीने गैरमार्गाने पास झालेल्यांना माफीचे साक्षीदार होणे, अन्यथा गुन्हा दाखल होऊन कारवाईला सामोरे जाणे हेच दोन पर्याय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फेरफार करून पात्र ठरलेल्या ७ हजार ८०० शिक्षकांपैकी काही शिक्षक कार्यरत आहेत. अशा शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जनअदालत संस्थेकडून नुकतीच करण्यात आली होती.

शासनाकडून परीक्षा घेण्याचा उपाय

खासगी कंपनीकडून परीक्षा न घेता शासनाकडून परीक्षा घेण्यात याव्यात. परीक्षा ज्या विभागाची आहे त्या विभागाच्या त्या जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेने परीक्षा आयोजित करावी. परीक्षेवेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही सुविधा असावी. परीक्षेचा डाटा शासनाकडे काही वर्ष ठेवला जावा. परीक्षा पेपर प्रिंटिंग करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका संकलित करणे आणि उत्तरपत्रिका तपासणी करणे, त्याचे संगणकीकरण करण्याबाबत उपाय योजना शासनाला सुचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

असे होतात ऑनलाइन पेपर फोडण्याचे प्रकार
ब्राउझर बेस परीक्षा घेणाऱ्या खासगी एजन्सी प्रश्नपत्रिका सर्व्हरवर काही तास आधी अपलोड करतात. ती प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही तास अगोदर पेपर फोडणाऱ्या टीम त्याचा प्रोग्रामिंग कोड ब्रेक करून परीक्षेपूर्वीच पेपर फोडतात.

परीक्षा केंद्रावरील संगणकात छेडछाड, लॅनचे कनेक्शन काढून उत्तरे पुरवणे.
परीक्षा घेणारी एजन्सी आणि परीक्षा केंद्र एकाच मालकीची किंवा अन्य परीक्षा केंद्राशी संगणमत करून सेंट्रल कमांड कोड बदलून ठरावीक सिट नंबरच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरे थेट ऑनलाइन बदलली जातात. यात उमेदवाराने निवडलेल्या उत्तरांचा काहीएक संबंध नसतो. उमेदवार पेपर सोडवल्याचे नाटक करतो.

ऑनलाइन पेपर फोडण्याचे प्रशिक्षण बिहारमध्ये
ऑनलाइन परीक्षेचे पेपर कसे फोडावे याच्या विविध पद्धतीबाबत प्रशिक्षण देणारे सेंटर बिहार येथील पाटणा येथे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे टीईटी प्रकरणात अटकेतील काही जणांनी प्रशिक्षण घेतले आहे का? त्या दृष्टीनेदेखील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या तपासातील बऱ्याच आरोपींचे संबंध भारतातील विविध परीक्षा फुटीशी असल्याचेही तपासात आढळून आले असून पेपर फोडणाऱ्यांचे भारतभर मोठे जाळे पसरले आहे. १५ वर्षांपासून काही जण सक्रिय सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...