आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशांताबाई शेळके यांच्या “तोच चंद्रमा नभात’ या अजरामर गीताचे प्रेरणास्थान असणारा “यः कौमारहरः...’ हा संस्कृत श्लोक शीलभट्टारिका या प्राचीन संस्कृत कवयित्रीचा आहे. राजशेखरासारख्या संस्कृत काव्यशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथकारांनी शीलभट्टारिकेच्या काव्याचा गौरव केलेला आहे. बदामीचा चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याचा पणतू विजयादित्य याने दिलेल्या एका ताम्रपटामध्ये तिचा उल्लेख येतो, असे संशोधन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी मांडले आहे.
शीलभट्टारिका ही सम्राट पुलकेशीची कन्या होती. तिचा विवाह म्हैसूरच्या गंग घराण्याचा राजपुत्र दडिग याच्याशी झाला होता. या दोघांचा पुत्र महेंद्रवर्मा याच्या शिफारशीवरून विजयादित्याने कर्नाटकाच्या विजयनगर जिल्ह्यातील चिगटेरी हे गाव विष्णुशर्मा या विद्वानाला दान दिले होते. इ.स. ७१७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात दिलेला हा ताम्रपट पुण्यातील अमित लोमटे यांच्या संग्रहात आहे. राष्ट्रकूट घराण्यातील राणी शीलमहादेवी ही शीलभट्टारिका असावी, अशी आजवर असलेली समजूत या नव्या शोधामुळे मागे पडणार आहे.
चालुक्य विजयादित्याच्या ताम्रपटासह एकूण चार ताम्रपटांचे संशोधन बापट यांनी केले. ते म्हणाले, आजच्या धाराशिव जिल्ह्यातील सारोळे आणि दाभे ही दोन गावे यादव सम्राट रामदेवराय यांचा सरदार माधव नायक याने २ फेब्रुवारी १२७६ या दिवशीच्या ताम्रपटाद्वारे एकूण चाळीस विद्वानांना दान केलेली होती. या भागातील ८४ गावांचे प्रशासकीय मुख्यालय तडवळे येथे होते. सारोळ्याच्या सीमांवर तेव्हा असणाऱ्या बेंबळी, मेढसिंगे, वाघोली, सांजे, तुगाव, काजळे आणि चिखली या गावांचा उल्लेखही या ताम्रपटात आहे.
ताम्रपट अमळनेरच्या विसपुतेंच्या संग्रहात डॉ. श्रीनंद बापट यांनी सादर केलेला चौथा ताम्रपट राजस्थानातील नाडोल इथल्या चौहान घराण्यातील राजा गजसिंह यांचा आहे. उदयपूर जिल्ह्यातील गोमती नदीच्या तीरावर वसलेले पडला हे गाव गजसिंहाने १९ डिसेंबर ११७४ रोजी दान दिलेले होते. जोधपूरच्या उत्तरेला असणाऱ्या मंडोर इथला पूर्वीचा प्रशासक वैजल्लदेव यांच्या निधनानंतर अकराव्या दिवशी झालेल्या वृषोत्सर्ग या विधीच्या वेळचे हे दान आहे. दान घेणारा विद्वान गोविंद हा सामवेदाचा उपासक होता. हा ताम्रपट अमळनेर इथले संग्राहक संजय भास्कर विसपुते यांच्या संग्रहात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.