आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:अडचणींवर मात करत 17 दिवसांत उभारले 1,600 बेडचे कोविड सेंटर; देशातील माेठ्या काेविड रुग्णालयांपैकी एक रुग्णालय

मंगेश फल्ले | पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिंपरीतील रुग्णालयाचे बुधवारी हाेणार उद‌्घाटन

काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुणे परिसरात वाढत असून पुणे जिल्ह्यात काेराेनाबाधितांचा आकडा एक लाख ४५ हजारांपर्यंत पाेहोचला असून सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ३१ हजार ३३४ आहे. तर, ३,४१६ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. वाढते प्रमाण पाहता पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये जम्बाे काेविड रुग्णालयाची तत्काळ उभारणी आवश्यक हाेती. त्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केवळ १७ दिवसांच्या कालावधीत पुण्यातील सीओईपी मैदान येथे ८०० बेडचे आणि पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे ८०० बेडचे अशी एकूण १,६०० बेडची सुमारे १६० ते १७० काेटी रुपयांची वातानुकूलित दाेन जम्बाे काेविड रुग्णालये उभारली आहेत. पुण्यातील रुग्णालयाचे रविवारी उद‌्घाटन करण्यात आले असून पिंपरीतील रुग्णालयाचे बुधवारी (२६ आॅगस्ट) उद‌्घाटन हाेणार आहे. देशातील सगळ्यात माेठ्या काेविड रुग्णालयांपैकी एक रुग्णालय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

पावसाळ्यात अत्यल्प वेळेत जम्बाे काेविड रुग्णालय उभारणीसाठी टेंडर निविदा प्रक्रिया राबवून रुग्णालयातील अत्यावश्यक गाेष्टींची पूर्तता करणे हे एक आव्हान असल्याचे सांगत पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे म्हणाले, पायाभूत सुविधा निर्मिती, वैद्यकीय मनुष्यबळ भरती, वैद्यकीय साधनांची खरेदी प्रक्रिया या तीन टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सहा आॅगस्ट राेजी सुरुवात झाली. दिल्लीच्या दीपाली डिझाइन्सच्या मदतीने पुण्यातील सीओईपीच्या ३२,००० चाै. मीटर मैदानावर हे १३,००० हजार चाै.मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे करण्यात आले. यात ६०० आॅक्सिजन खाटा असून २०० खाटा या आयसीयूकरिता राखीव आहेत. आयसीयूतील सर्व साेयी-सुविधा, प्रशिक्षित डाॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले. संबंधित रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली असता पावसाने व्यत्यय आणल्याने मैदानावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले हाेते. त्यामुळे मैदानावर माती भरून ती पूर्ववत करून हाॅस्पिटलची उभारणी करण्यात आली. पुण्यात सरासरीच्या ७० टक्के पर्जन्यमान या काळात हाेत असल्याने रुग्णालय जलराेधक व ताशी १२५ किलाेमीटर वाऱ्याचा वेगसुद्धा सहन करू शकेल असे भक्कम बनवले आहे.

जम्बाे रुग्णालय उपयुक्त ठरेल

पुण्याचे महापाैर मुरलीधर माेहाेळ म्हणाले, पुण्यातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या व काेराेना मृत्यूंची संख्या पाहता जम्बाे काेविड रुग्णालय उभारणे आवश्यक हाेते. आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची गरज लक्षात घेऊन जम्बाे काेविड रुग्णालयाकरिता आर्थिक निधी उभारणीसाठी राज्य सरकारने ५० टक्के, पुणे मनपाने २५ टक्के, पिंपरी-चिंचवड मनपाने १५ टक्के आणि पीएमआरडीएने दहा टक्के याप्रमाणे निधीचा वाटा देण्यात आला आहे. अत्यंत कमी वेळेत रुग्णालय बांधून पूर्ण झाले असून नागरिकांच्या आराेग्याच्या हिताच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल.