आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:मोक्का गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाच्या आवारातच दिला गांजा, पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात घडला प्रकार

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात मोक्का खाली अटक केलेल्या एका आरोपीला त्याच्या साथीदाराने गांजा पुरविल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी घडला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपीला त्याच्या साथीदाराने न्यायालयातील गर्दीचा फायदा घेत गांजाची पुडी दिली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या आरोपीसह त्याला गांजा पुरविणाऱ्या साथीदारावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहबूब जब्बार पठाण (वय 25, रा. स्वारगेट,पुणे ) याच्यासह साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. पठाण याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पठाणला गुरुवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी पोलिस कर्मचारी त्याच्यासोबत होते. त्यावेळी न्यायालयातील गर्दीचा फायदा घेत पठाणच्या साथीदाराने त्याला एक ग्रॅम गांजाची पुडी दिली.

आरोपींचा शोध सुरू

पोलिसांनी पठाणची झडती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांकडून न्यायालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपीला गांजा देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...