आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसार मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता पसार झालेल्या आरोपीस स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपीने पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची फसवणूक केली होती. गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता.
हितेश नानकराम आसवानी (वय 35, रा. दत्तनगर, भांडेवाडी, बगडगंज, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा साथीदार भूषण वसंत तन्ना (रा. लवकुश, वाठोडरिंग रोड, नागपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आसवानी आणि तन्ना यांनी पिंपरीतील काळेवाडी परिसरात राधा एंटरप्रायजेस नावाने व्यवसाय सुरू केला होता. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून तूप, गूळ, बदाम, सुपारी, रवा असा माल मोठ्या प्रमाणावर खरेदी केला होता. सुरुवातीला आसवानी आणि तन्ना यांनी व्यापाऱ्यांचे पैसे दिले. त्यानंतर व्यापाऱ्यांची पैसे थकवून दोघेजण पसार झाले.
आरोपींच्या विरुद्ध पुण्यातील स्वारगेट, सांगलीतील तासगाव, नागपूरमधील लकडगंज, नंदनवन, तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल झाले होते. आरोपी आसवानी पिंपळे गुरव परिसरात येणार असल्याची माहिती स्वारगेट पोलिस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आसवानीला पकडले. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारू, सोमनाथ कांबळे, शिवदत्त गायकवाड, फिरोज शेख, प्रवीण गोडसे, अनिस शेख, रमेश चव्हाण आदींनी ही कारवाई केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.