आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आत्मभान जागवणारे वीस फूट उंचीचे विठ्ठलाचे शब्दशिल्प, संदेश भंडारे यांची संकल्पना

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडी मार्गावरील पिराची कुरोलीजवळील चिंचणी येथे उभारण्यात आलेले शब्दशिल्प. - Divya Marathi
दिंडी मार्गावरील पिराची कुरोलीजवळील चिंचणी येथे उभारण्यात आलेले शब्दशिल्प.

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ या संत तुकाराम महाराज यांच्या वचनाचे मूर्त रूप म्हणून विठ्ठलाचे त्रिमितीमधील वीस फूट उंचीचे शब्दशिल्प उभे करण्यात येत आहे. वारीच्या शेवटच्या मुक्कामाच्या वाटेवर पंढरपूरच्या अगदी जवळ पिराची कुरोली जवळील चिंचणी येथे या शिल्पाची उभारणी होत आहे.

भाषिक संगम आणि सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतिकात्मक शिल्प उभारण्याची संकल्पना प्रसिद्ध छायाचित्रकार आणि वारी परंपरेचे अभ्यासक संदेश भंडारे यांची आहे. हे शब्दशिल्प प्रत्यक्ष उभारण्याची संपूर्ण जबाबदारी ट्रस्टसह चिंचणी, पिराची (कुरोली) ग्रामस्थांनी पार पाडली आहे. तर, आर्थिक जबाबदारी राज्यातील अनेक संवेदनशील नागरिकांनी घेतली आहे, अशी माहिती आत्मभान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश भंडारे आणि मोहन अनपट यांनी दिली.

शब्दशिल्पाविषयी माहिती देताना भंडारे म्हणाले, महाराष्ट्राचे लोकदैवत विठोबा, भक्ती संप्रदायाचे आद्य प्रतीक आहे. विविध भाषा,संस्कृतींचे एकजिनसी अस्तित्व म्हणजे पंढरपूरची वारी. या अस्तित्वाचे विविध पदर वारकरी संतांनी आपल्या अभंग,ओवी आणि काव्यातून अजरामर केले आहेत. भाषा हे पृथ्वीवरील माणसांशी संवाद-संपर्क साधण्यासाठी माणसानेच शोधलेले एक विलक्षण साधन. भाषेने माणसं जोडली गेली, संवाद घडला, परस्पर प्रेम, जिव्हाळा वाढला.

भक्ती मार्गाचा संदेश देणाऱ्या संतांनी आपल्या काव्य-अभंग-ओवी अशा साहित्यातून याच भाषेचा अपूर्व साक्षात्कार आपल्याला घडवला. विठ्ठल म्हणजे प्रेमाची भाषा रुजवणारा संतांचा सखा झाला. वारी म्हणजे अभंग-भाषा-प्रेम-जिव्हाळा सांडणारा प्रवाह झाला. आपण सर्व गेली आठशे वर्ष हा संतभाव जीवापाड जपला आहे. या संत साहित्यातून आणि काव्यातून मराठी भाषा समृद्ध झाली. नामदेव, तुकोबा, जनाबाई, चोखामेळा आणि संत शेख महंमद अशा अनेक संतांच्या साहित्यातून मराठी, कोकणी, कानडी, तेलगू, हिंदी, भोजपुरी आणि उर्दू,पर्शियन,अरबी अशा विविध भाषांतील शब्दांचा आणि त्या भाषांचा सहज वापर झालेला दिसतो. संतांनी आम्हाला भाषिक सहिष्णुतेची महती शिकवली. त्याचे मूर्त रूप म्हणजे विठ्ठलाचे हे शब्दशिल्प आहे. या शिल्पात मराठी, कानडी, हिंदी, उर्दू, फारसी,अरबी, तेलगू, अशा भाषांतील मराठीमध्ये स्थान मिळवलेले शब्द विठ्ठल रूपात साकारले, असे भंडारे यांनी सांगितले.

जगभराने स्वीकारलेल्या मराठी भाषेतील शब्द
विठ्ठलाच्या रेखाकृतीत साकारलेल्या या शिल्पात मराठीत रुजलेल्या अन्य भाषेतील समानार्थी शब्दांची रेखाटने आहेत. जगभरातील अनेक भाषांतील मराठी शब्द किंवा इतर भाषेतून मराठीने स्वीकारलेले शब्द या विठ्ठलाच्या आकृतीत सामावले आहेत. या सर्व शब्दांनी त्या, त्या भाषेत वेगवेगळी लिपी स्वीकारली. त्यांचा लिखित आकार बदलला. परंतु, अर्थ मात्र तो राहिला. भाषा आणि शब्द कोणतेही असो अर्थाचा विठ्ठल तोच राहिला. - संदेश भंडारे, संकल्पक

बातम्या आणखी आहेत...