आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन अॅडमिशन:वाढलेल्या गुणांमुळे यंदा 11 वीसाठी 3 ते 4 टक्क्यांनी वाढणार ‘कट ऑफ’; प्रवेश फेऱ्याही वाढणार, अपेक्षित शाखा-कॉलेजसाठी चुरस

पुणे4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • वाणिज्य शाखेत प्रवेशाकडे मोठा कल

राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) उच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने महाविद्यालयीन प्रवेशासाठी ‘कट आॅफ’ कळीचा मुद्दा ठरणार आहे. शिक्षणतज्ज्ञांनुसार यंदा ३ ते ४ टक्क्यांनी ‘कट आॅफ’ वाढणार आहे. यंदा ९५ आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे हजारो विद्यार्थी असल्याने उपलब्ध जागा, अपेक्षित विद्याशाखा, नामांकित शिक्षण संस्था यांच्या जोडीने प्रवेशासाठीच्या फेऱ्याही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी राज्यभरात चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी प्राचार्य सुदाम कुंभार म्हणाले, ‘शैक्षणिक वर्ष २०२० पेक्षा २०२१ च्या निकालांमध्ये ४.९५ % नी वाढ झालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणांच्या बाबतीत विचार केल्यास गुणांची टक्केवारी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पुणे विभागात २.६२% आणि मुंबई विभागात ३.२४% विद्यार्थी जास्त उत्तीर्ण झालेले आढळतात. ही टक्केवारी अगदी अल्प दिसत असली तरी विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे कठीण जाणार आहे.

वाणिज्य शाखेत प्रवेशाकडे मोठा कल
१. ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये वाढलेल्या गुणांमुळे कमी गुण प्राप्त केलेल्या मुलांना प्रवेश मिळणे कठीण असेल.

२. वाढलेल्या एकूण टक्केवारीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचे महाविद्यालय तसेच आवडीची विद्याशाखा मिळण्यात अडचण येऊ शकते.

३. ऑनलाइन वर्ग तसेच शाळांनी दिलेल्या सूचनांनुसार ज्या विद्यार्थ्यांना पालकांनी सहकार्य केले असे विद्यार्थी त्यांच्या वाढलेल्या गुणांमुळे इच्छुक महाविद्यालयात पहिल्या व दुसऱ्या प्रवेश फेरीत प्रवेश मिळवू शकतात.

४. सामान्यतः विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा कल जास्त दिसून येतो. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी मोठी रांग लागण्याची शक्यता आहे.

५. ३.२४% इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी एकूण गुणांतील फरक पाहता प्रवेशासाठी खूप मोठी स्पर्धा असेल हे मात्र स्पष्ट आहे.

पुण्यातील ‘कट आॅफ’.
राज्यात १०० टक्के मिळवणारे नऊशेवर विद्यार्थी एखाद्या महाविद्यालयात केवळ ९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकतो.

 • लातूर२७८
 • औरंगाबाद२६१
 • अमरावती१०५
 • कोल्हापूर९२
 • पुणे७९
 • नाशिक६१
 • मुंबई३२
 • नागपूर२५
 • कोकण२४

डिप्लोमा, आयटीआयकडे ओढा
विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या गुणांमुळे काही विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम तसेच औद्योगिक (आयटीआय) अभ्यासक्रमाकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. एकूणच प्रत्यक्ष शाळेत न जाता घरी बसून केलेला अभ्यास आणि शाळेत जमा केलेले गृहपाठ यावर आधारित प्राप्त निकाल आणि नेहमीपेक्षा जास्त मिळालेल्या गुणांचा विचार करता इ. ११ तील प्रवेशासाठी स्पर्धा ही नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांना जेरीस आणणारी असेल.

 • दहावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी : १५ लाख, ७४ हजार, ९९४
 • राज्याची निकालाची : ९९.९५ %
 • उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थी : ७४ हजार, ६१८ (९०.२५ टक्के)
 • २७ विषयांचा निकाल १०० टक्के
 • ७५ % व अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ६ लाख, ४८ हजार, ६८३
 • प्रथम श्रेणी मिळवणारे विद्यार्थी - ६ लाख, ९८ हजार, ८८५
 • २२,३८४ शाळांचा निकाल १०० %
 • खासगी विद्यार्थी २८,४२४

६० ते ८० % मिळालेल्या विद्यार्थ्यांना अडचणी जास्त
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ जयवंत कुलकर्णी म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कट ऑफ नक्की वाढतील. खासकरून कला शाखेचे जास्तच चढे राहतील. मुंबई पुणे, ठाणे या ठिकाणी ते नामवंत महाविद्यालयात ९८+ राहतील. अपवादात्मक विज्ञान शाखेचे ९४ च्या खाली येतील. प्रवेश फेऱ्याची संख्या तशी तीनपर्यंत राहील. चौथी गरज पडल्यास समुपदेशन फेरी, तीही काही तांत्रिक कारणाने घ्यावी लागल्यास होईल. कारण प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत बसण्याबाबत कोणी फारसे उत्सुक राहील असे वाटत नाही. उपनगरांतील जवळची महाविद्यालये निवडण्यावर भर जास्त राहील. मात्र, या सर्व प्रक्रियेत ६०/८०% मधील मुलांची बरीच कुचंबणा होऊ शकते. त्यांना प्रवास करून राहत्या ठिकाणांपासून दूरची महाविद्यालये मिळू शकतील. परिणामी त्यांचा कल हा मिळेल ते जवळचे महाविद्यालय पदरात पाडून घेण्यावर भर राहील.

बातम्या आणखी आहेत...