आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना महामारीच्या विरोधात निर्णायक लढाई मंगळवारपासून सुरू झाली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील कारखान्यातून ‘कोविशील्ड’ लसीची पहिली खेप देशातील १३ शहरांत पोहोचली आहे. तेथून राज्य सरकारांच्या मदतीने लसीकरण केंद्रांपर्यंत लस पोहोचवली जाईल. देशात कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होत आहे.
एअर इंडिया, स्पाइसजेट, इंडिगोच्या विशेष विमानांनी ‘कोविशील्ड’चे ५६.५ लाख डोस पुण्याहून रवाना झाले. ही लस दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनऊ व चंदीगड येथे पोहोचवण्यात आली. लस घेऊन जाणारे पहिले विमान सकाळी ८ वाजता पुण्याहून दिल्लीला रवाना झाले. तत्पूर्वी, पुण्यात ३ विशेष ट्रकद्वारे लसीची पहिली खेप काढण्यात आली. त्यात लसीचे ३४ बॉक्स ठेवण्यात आले. त्यांचे वजन सुमारे १,०८८ किलो असल्याचे सांगण्यात आले.
आधी शेजारी देशांना, नंतर खुल्या बाजारात : कोरोना लस देशातील वापरानंतर शेजारी देशांना दिली जाईल. त्यात बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार व अफगाणिस्तानचे नाव आहे. मात्र पाकिस्तानचा उल्लेख नाही. नेपाळने १.२ कोटी व बांगलादेशने ३ कोटी डोसचा पुरवठा करण्याचा आग्रह धरला आहे. यानंतर कोरोना लस खुल्या बाजारात आणण्याची परवानगी भारत सरकार देऊ शकते.
बायोटेकही तयार
हैदराबाद | ‘कोव्हॅक्सिन’ या भारत बायोटेकच्या स्वदेशी लसीचीही पहिली खेप तयार आहे. ही लस हैदराबादेतून ११ शहरांत पाठवली जात आहे.
सीरमबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली : पुण्यातील सीरमच्या कारखान्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लस घेऊन जाणाऱ्या वाहनांचीही जीपीएसद्वारे २४ तास निगराणी केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने लस घेऊन जाणाऱ्या ट्रकला पोलिस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काही दिवसांत आणखी ५ ट्रकद्वारे गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणाला ‘कोविशील्ड’चा पुरवठा केला जाईल. पहिल्या टप्प्यात भारत सरकारने एसआयआयला १ कोटी ११ लाख डोसच्या पुरवठ्याची ऑर्डर दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.