आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद:साखरेच्या धंद्यात तोटा झाल्याने आरोपी झाला दरोडेखोर

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे अहमदनगर रस्त्यावर शिरुर तालूक्‍यात सलग दोन पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. थंडीचे दिवस असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचारी रात्रीच्या वेळी बाहेर न थांबता केबीनमध्ये झोपतात. ही बाब हेरून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात येत होता. यामुळे ग्रामीण पोलिसांनी पेट्रोल पंप चालकांना रात्रीच्या वेळी बाहेर लक्ष ठेवण्यासाठी एखादा दुसरा कर्मचारी ठेवावा असे आवाहन केले आहे.

करण युवराज पठारे(20,रा.गुजरमळा, शिरुर), रोहन सोमनाथ कांबळे ( 20, रा.बोऱ्हाडेमळा, शिरुर), अजय जगननाथ माळी(23,रा.श्रीगोंदा) आणि अजय सोमनाथ लकारे (21, रा.श्रीगोंदा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

व्यवसायातील लॉसमुळे दटाकला दरोडा

टोळीचा मुख्य सूत्रधार करण पठारे आहे. तो शिरुर परिसरातच रहाणारा असून त्याचा साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यामध्ये त्याला सात ते आठ लाखाचे नुकसान झाले होते. हे नूकसान भरुन काढण्यासाठी त्याने वीटभट्टी कामगार असलेले लकारे आणि माळी तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कांबळेला हाताशी धरले. या व्यतिरीक्त आणखी दोन साथीदारांना घेऊन त्याने दरोड्याचा कट रचला. तो शिरुरमध्ये रहाणारा असल्याने त्याने 12 नोव्हेंबरला श्री शिवसाई फ्युअल स्टेशन हा शिरुरमधला पेट्रोल पंप लूटला. येथे कोयत्याचा धाक दाखवून 49 हजाराची रोकड चोरली. यानंतर 15 नोव्हेंबरला न्हावरा गावच्या हद्दीतील आयओका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून 1 लाख 2 हजाराची रोकड चोरली.

सलग दोन दरोडे एकाच तालूक्‍यात पडल्याने पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांची पथके तयार केली. त्यांनी तांत्रीक माग व खबऱ्यांकडून माहिती मिळवू चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेले कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांचे इतर दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या पथकाने केली. याप्रकरणाचा तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करत आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल म्हणाले की, महामार्गावरील पेट्रोल पंपावरील कर्मचारी थंडी वाढल्याने रात्रीच्या वेळी बाहेर न थांबता केबीनमध्ये झोपतात. ग्राहक आल्यास पटकन जाता यावे म्हणून केबीनचे दार उघडेच ठेवलेले असते. यामुळे दरोडेखोर थेट केबीनमध्ये घुसून कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून रोकड लूटतात. बाहेर कोणच कर्मचारी नसल्याने त्यांना आरडा ओरडा होईल किंवा विरोध होईल याची भिती रहात नाही. यामुळे थंडीच्या दिवसांत दरोडेखोरांची कार्यपध्दती लक्षात घेऊन पेट्रोल पंप चालकांची दक्षता घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...