आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:ऐतिहासिक ‘मोडी लिपी’चा आता आधुनिक ‘डिजिटल’ रूपाकडे प्रवास

पुणे / जयश्री बोकील6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मोडी लिपी’त करा लेखन, चॅट आणि पोस्ट्स

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि अर्थातच शिवाजी महाराजांच्या युगप्रवर्तक योगदानाचा अनमोल ठेवा ज्या लिपीने जपून ठेवला आहे, ती मोडी लिपी आता आधुनिक युगात ‘डिजिटल’ रूपाकडे प्रवास करत आहे. इतिहासाचे अस्सल साधन मानली जाणारी मोडी लिपी आता कागदपत्रांपुरती मर्यादित राहिली नसून या लिपीने डिजिटल रुपडे घेऊन इंटरनेटवर बस्तान बसवले आहे. भाषा आणि लिपी वापरात राहिली तरच टिकतात या उक्तीचा आदर्श मानून कोल्हापूर येथील मोडी अभ्यासक आणि संगणकतज्ज्ञ नवीनकुमार माळी यांनी ऐतिहासिक मोडी लिपीला डिजिटल रूप दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाची नोंद तरुणाई घेत आहे.

या उपक्रमाविषयी माळी म्हणाले, ‘मोडी लिपीतील लक्षावधी अस्सल कागदपत्रे आज अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी युवा पिढीच्या प्रतिनिधींचे लक्ष मोडी लिपीकडे वेधून घेणे मला आवश्यक वाटले आणि त्यातून खास मोडी लिपीसाठी समर्पित अशी ‘https://modifier.in/’ ही सोशल मीडिया वेबसाइट मी तयार केली. त्याद्वारा मोडी लिपी आधुनिक होत आहे. मोडी लिपीचे आधुनिक फाँट तयार झाले आहेत.

मोडी लिपीमध्ये पुस्तके, ई-पुस्तके, मासिके प्रकाशित होत आहेत. एवढेच काय तर सर्व प्रकारच्या डिजिटल टंकलेखन, वाचन यासाठी मोडी लिपीचा वापर करता येणारी सोशल मीडिया वेबसाइट प्रकाशित केली आहे. मोडी लिपीने आपली फक्त ‘ऐतिहासिक हस्तलिखित लिपी’ ही ओळख बदलून आधुनिकतेची वाट धरली आहे. मोडी लिपी मॉडिफाय झाली आहे.

असा आहे इतिहास : शिवपूर्वकाळातही होत असे मोडीचा वापर
मोडी लिपी ही मराठी भाषेची एक लिपी आहे. मोडी लिपीचा वापर प्रामुख्याने मध्ययुगीन महाराष्ट्रात शीघ्रलेखनासाठी झाला. लेखन करताना शक्यतो हात न उचलता एका लेखणीच्या टाकाने थोडक्या वेळात पुष्कळ मजकूर लिहिता येत असे. तत्कालीन लेखन जलद गतीने करण्यासाठी मोडीचा वापर होत असे. राजकीय, आर्थिक, महसुली, न्यायालयीन दस्तऐवजासाठी तसेच सरकारी व खासगी पत्रव्यवहार यासाठी मोडी लिपीचा वापर होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीचा वापर राजलिपी म्हणून केला होता. शिवपूर्वकाळात मोडीचा वापर झाला होता आणि शिवकाळानंतरही मोडीचा वापर सुरू होता, असे माळी म्हणाले.

शिवकाळातील नवे संशोधन समोर येण्यास मदत
युवा पिढीला सर्व काही डिजिटल उपलब्ध आहे. म्हणून मोडी लिपी पण डिजिटली उपलब्ध केली आहे. देवनागरी लिपीचा वापर करून केलेले टंकलेखन मोडी लिपीमध्ये रूपांतरित करता येत आहे व टंकलिखित मोडी देवनागरी लिपीमध्ये रूपांतरित करता येत आहे. मोडी लिपीच्या डिजिटल वापराने मोडीला एक डिजिटल स्थान मिळेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोडी जलद गतीने पोहोचेल. यातून मोडी अभ्यासक, वाचक तयार होतील. त्यातून शिवकाळातील इतिहासाचे नवे संशोधन समोर येऊ शकते. -नवीनकुमार माळी