आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फसवणूक:सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणारे रॅकेट उद‌्ध्वस्त

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका जवानासह तिघे अटकेत, कागदपत्रे घेऊन धरत होते उमेदवारांना वेठीस

सैन्यात शिपाई पदाच्या नोकरीसाठी लाखो रुपये उकळणारे रॅकेट लष्कराची गुप्तचर यंत्रणा, गुन्हे शाखेच्या युनिट २ आणि युनिट ५ ने संयुक्तीकरित्या कामगिरी करत उध्वस्त केले. लष्करात हवालदार पदावर नोकरीस असलेल्या एकासह तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

हवालदार जयदेवसिंग परिहार, इतर आरोपी वेनसिंग लालसिंग रावत आणि रविंद्र गजेंद्रसिंग राठोड (दोन्ही रा. राजस्थान) अशी जेरबंद करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

सैन्य दलात सन २०२० च्या शिपाई पदाच्या भरतीच्या जागा निघाल्या होत्या. यासाठी जानेवारीत जाहिरात प्रसिध्द झाली होती. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी बीड येथे शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा पास केली होती. जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांची शनिवारी (३१ ऑक्टोबर) लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, या परीक्षेमध्ये पास करण्याचे अमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणुक केल्याची माहिती कमांड लायजन युनिट (लष्कराची गुप्तचर यंत्रणा) अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस उपायुक्त गुन्हे बच्चनसिंग यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराविषयी माहिती दिली. त्यानुसार सिंग यांनी गुन्हे शाखेकडील युनिट-२ चे प्रभारी अधिकारी महेंद्र जगताप व युनिट-५ चे सहायक पोलिस निरीक्षक तासगावकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

अधिकारी व कर्मचारी तसेच सदर्न कमांड लायजन युनिटचे अधिकारी व जवान यांनी संयुक्तिक वेगवेगळे पथक तयार करून सापळा रचला. त्यानुसार उमेदवारांची फसवणूक करणारा लष्करातील हवालदार जयदेवसिंग परिहार व दोन खासगी व्यक्ती वेनसिंग लालसिंग रावत आणि रविंद्र गजेंद्रसिंग राठोड यांना ताब्यात घेतले. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? यादृष्टीने तपास सुरू आहे.

हॉल तिकीट घेणाऱ्यांना गेटवरच हेरायचे

शिपाई पदाच्या या भरतीमध्ये शारीरिक क्षमता चाचणीत पास झालेले उमेदवार हे लेखी परिक्षेचे हॉलतिकीट घेण्यासाठी कॅम्प येथील झोनल ऑफिस येथे आल्यानंतर तेथेच गेटवर हवालदार परिहार उमेदवारांना हेरत होता. परिहार हा रावत आणि राठोड यांच्याशी उमेदवारांची ओळख करून देत होता. अशा प्रकारे त्या दोघांनी १७ जणांना नोकरी लाऊन देतो, असे अमिष दाखवून खासगी इमारतीमध्ये प्रशिक्षण दिले व लेखी परीक्षेचा खरा पेपर आहे असे सांगितले. परंतु, परीक्षेमध्ये प्रत्यक्षात दुसरेच प्रश्न आले. उमेदवार हे स्वतःच्या बौध्दीक क्षमतेवर पास होत असले तरी आरोपींनी उमेदवारांकडून दीड लाख रुपये घेतल्याशिवाय त्यांची मूळ कागदपत्रे परत न देता त्यांना वेठीस धरले. तिघांविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.