आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने 20 तक्रारदारांना मिळाले मोबाईल:राज्यासह परराज्यात संपर्क साधून मोबाइल केले जप्त

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांचे हरविलेले 20 मोबाईल परत मिळवून देण्यास शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. राज्यासह परराज्यात संपर्क साधून मोबाइल जप्त करण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांना बोलावून मोबाइल देण्यात आले अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी (1 नोव्हेंबरला) दिली.

विविध भाषांमध्ये साधला संवाद

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी हद्दीत हरवलेल्या मोबइलचा डेटा तयार केला. त्याबाबत तांत्रिक तपास करीत त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित मोबाईल फोन वापरकत्र्याशी संपर्क करून कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा भाषामध्ये संवाद साधून हरवलेले 20 मोबाईल फोन ताब्यात घेतले.

आनंद केला व्यक्त

हरवलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदारांना परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक विक्रम गौड, बाजीराव नाईक, एपीआय भोलेनाथ अहीवळे, अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

ज्वेलर्सकडून 12 नागरिकांची फसवणूक

कमी टक्के व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने नागरिकांकडील दागिने ताब्यात घेउन माघारी न देता ज्वेलर्सने फसवणूक केली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. त्याने 12 जणांची 14 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना जानेवारी 2018 पासून ऑक्टोबर 2022 कालावधीत वारजेतील श्री उदावंत ब्रदर्स सराफ मनीलेंडर्स दुकानात घडली.दिलीप किसनराव उदावंत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्वेलर्सचे नाव आहे. याप्रकरणी विलास कडू (वय 32 रा. नऱ्हे,पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

14 लाखांचा गंडा

विलास कडू यांनी ज्वेलर्स दिलीप उदावंत याच्याकडून शेकड तीन टक्के व्याजाने 40 हजार रूपये घेतले होते. त्याबदल्यात उदावंतने त्यांच्याकडून 17 ग्रॅम सोन्याचे दागिने तारण ठेवले. काही महिन्यांनी विलासने 85 हजार रूपये परत करूनही ज्वेलर्स दिलीपने त्यांचे तारण ठेवलेले दागिने माघारी न देता फसवणूक केली. त्याशिवाय इतर 11 जणांची अशाचपद्धतीने फसवणूक करून 14 लाखांना गंडा घातला आहे.

बातम्या आणखी आहेत...