आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, रोज दोनशे रुग्णांना होणार उपयोग

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना साथीमध्ये वैद्यकीय उपयोगाच्या ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीकरिता सीरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला आहे. आॅक्सिजन निर्मितीसोबत दररोज २०० कोरोना रुग्णांना पुरेल अशा वैद्यकीय उपयोगाच्या ऑक्सिजन सिलिंडर निर्मितीचा प्रकल्प पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. इन्स्टिट्यूटच्या वतीने हे सिलिंडर रुग्णालयांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटसह पुण्यातील प्रायमूव्ह इंजिनिअरिंगने युद्धपातळीवर विक्रमी वेळेत म्हणजे फक्त १२ दिवसांत हा प्रकल्प साकारला आहे.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कॉम्प्रेसरसारख्या गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आणण्यापासून कस्टम क्लिअरन्स, एफडीए परवानगी, पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्थांच्या परवानग्या, प्रत्यक्ष प्रकल्पाची उभारणी या गोष्टी फक्त १२ दिवसांत पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आली. अदर पूनावाला यांच्या मार्गदर्शनाखाली सीरम इन्स्टिट्यूटने या सर्व प्रकल्पाचा खर्च उचलला आहे.

प्रायमूव्ह कार्यकारी संचालक राजेश दाते तसेच केदार गोखले म्हणाले, गॅस हाताळणे हे प्रायमूव्हचे प्रारंभापासूनच क्षेत्र आहे. प्रायमूव्ह एलपीजी, प्रोपेन आणि सीएनजी क्षेत्रात सक्रिय आहेत. मागील काही वर्षांत, प्रायमूव्हने बायोसीएनजी (सीबीजी) तयार करण्यासाठी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

वैद्यकीय उपयोगाच्या ऑक्सिजनची निर्मिती
सीरम येथे स्थापित प्रकल्प दिवसाला २०० रुग्णांना उपयोगी पडेल इतके वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडर भरण्यास सक्षम आहे. आयएस कोड आणि एफडीए मानकांनुसार आवश्यक वैशिष्ट्यांसह ९३ टक्क्यांपेक्षा जास्त शुद्धतेचा ऑक्सिजन १५० बारच्या दाबाने सिलिंडर्समध्ये ऑक्सिजन भरला जात आहे. एका सिलिंडरमध्ये सात हजार लिटर ऑक्सिजनची क्षमता असते. रुग्णालयात, एका सामान्य रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता दर मिनिटास सुमारे २.५ लिटर ऑक्सिजनची आवश्यकता असते.

बातम्या आणखी आहेत...