आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना योद्धा:35 दिवस कोरोनाशी लढून जिंकले प्री-मॅच्योर बाळ; आईला कोरोना होऊन कधी बरा झाला कळलेच नाही, दोघांच्या शरीरात सापडले अँटीबॉडी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लहान मुलांमध्ये आजारापासून बरे हाेण्याची क्षमता -डॉक्टर

काेराेनाचे थैमान जगभरात सध्या पसरलेले असून भारतातही त्याची व्याप्ती माेठ्या प्रमाणात झाली आहे. देशातील शहरी भागात काेराेना रुग्णांची संख्या ग्रामीण भागापेक्षा अधिक संख्येने दिसून येत असून सर्व वयाेगटांत काेराेनाचा शिरकाव झाल्याचे आढळून येते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाने तब्बल २२ दिवस व्हेंटिलेटरवर उपचार घेत एकूण ३५ दिवस मृत्यूशी लढा देत काेराेनाची लढाई जिंकली आहे. अशा प्रकारच्या गंभीर आजाराची मुदतपूर्व जन्मलेल्या छाेट्या बाळांमध्ये काेराेनाची काेठे नाेंद नाही.

ज्येष्ठ नागरिकांसाेबतच गर्भवती महिला या काेविडच्या उच्च जाेखीम गटात येत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागते. त्यातच आई जर काेराेना पाॅझिटिव्ह असेल तर त्यांना मानसिक तणावाला सामाेरे जावे लागते. कारण हा आजार आईकडून बाळास जाईल की नाही याबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जातात. काेराेना विषाणूचे संक्रमण हे आईकडून बाळास हाेण्याचे प्रमाण जगभर वाढते असले तरी अशा केसचे एकूण प्रमाण कमी आहे. सुदैवाने जगभर बहुतांश काेराेना पाॅझिटिव्ह आईचे बाळ हे कोणत्याही लक्षणांशिवाय जन्मास येते. परंतु अपवादात्मक स्थितीत बाळास काेराेनाची लागण हाेते. अशाच प्रकारे पुण्यातील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये मुदतीच्या आधी एका आईने बाळास जन्म दिला. जन्माच्या वेळी त्याचे वजन केवळ १.८ किलाे हाेते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास हाेत हाेता व आॅक्सिजन देण्याची गरज हाेती. बाळाची काेविड तपासणी केली असता ते काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हाॅस्पिटलमध्ये अशा बाळाकरिता लागणाऱ्या सुविधांचा वापर करत तज्ञ डाॅक्टरांनी मुलास वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. खासगी हाॅस्पिटलमधून मुलास भारती हाॅस्पिटलमध्ये विशिष्ट रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले. परंतु पुढील दाेन दिवसांतच बाळास हळूहळू श्वासाेच्छ‌्वासाची अडचण वाढत गेली व बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी बाळाला फुफ्फुसात ‘सर्फेक्टंट’ नावाचे विशेष औषधाचे डाेस देण्यात आले. परंतु बाळाला १०० टक्के ऑक्सिजन आवश्यक हाेता. त्यामुळे त्यास हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर या विशेष प्रकारच्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी नायट्रिक ऑक्साइड नावाचा एक विशेष वायूदेखील या वेळी वापरला गेला. राेगप्रतिकारशक्तीस मदत करण्याकरिता इंट्राव्हेन्स इम्युनाेग्लाेबुलिन ही थेरपीही देण्यात आली. एक्स-रेमध्ये बाळाच्या दाेन्ही फुफ्फुसांत प्राैढांसारखाच न्यूमाेनिया सर्वत्र पसरल्याचे दिसत हाेते. बाळाच्या आणि आईच्या रक्ताच्या तपासण्या केल्या असता, दाेघांतही काेराेना अँटिबाॅडी दिसून आल्या. म्हणजेच आईला काेराेना हाेऊन गेला, परंतु तिच्यात काेराेनाची काेणतीही लक्षणे दिसून न आल्याने तिला काेराेना झाल्याचे समजले नाही.

बाळात राेगाची तीव्रता वाढल्याने पालकांशी बाेलणे करून डाॅक्टरांनी पाच दिवस उच्च डाेस स्टिराॅइड‌्स दिल्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा हाेऊ लागली. तब्बल २२ दिवस बाळ व्हेंटिलेटरवर हाेते व त्यापैकी १६ दिवस ते हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटरवर हाेते. २५ व्या दिवशी बाळाच्या फुफ्फुसात काही फायब्राेसिस दिसून आले, ज्या काेराेना बऱ्या झालेल्या काही प्राैढ रुग्णांत दिसून येतात. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरपीनंतर बाळाला ३५ व्या दिवशी सुखरूप घरी सोडण्यात आले.

लहान मुलांमध्ये आजारापासून बरे हाेण्याची क्षमता

प्राैढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कोणत्याही आजारापासून बरे हाेण्याची प्रचंड क्षमता असते. त्यामुळेच ते बाळ ही लढाई जिंकू शकल्याचे मत भारती हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे नवजात बालक अतिदक्षता विभागाचे प्रमुख डाॅ.प्रदीप सूर्यवंशी आणि वैद्यकीय संचालक डाॅ.संजय ललवाणी यांनी व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...