आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • The Prisoner Ordered A Mobile Phone And A SIM Of Each Of The Three Companies Through A Sign Language Letter; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:सांकेतिक भाषेतील चिठ्ठीतून कैद्याने मागवला मोबाइल व तीन कंपन्यांचे प्रत्येकी एक सिम

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येरवडा कारागृहातील आरोपी भावाने बहिणीला चिठ्ठी लिहिल्याचे पोलिस तपासात उघड

सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये उसने दिल्यानंतर त्याबदल्यात २५ लाख रुपये वसुलीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात रवानगी झालेल्या आरोपीने अापल्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्याने दोन सॅमसंग गुरू मोबाइल हँडसेट, एअरटेल, व्होडाफोन, आयडियाचे प्रत्येकी एक सिमकार्ड कारागृहात पोहोचते कर, अशी सूचना दिली होती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. याच मुद्द्यावरून न्यायालयानेही आरोपी महिलेचा जामीन अर्ज फेटाळला, हे येथे उल्लेखनीय. सागर कल्याण राजपूत (वय ३४, रा. शास्त्रीनगर, कोथरूड. मूळ रा. कल्प डिझायनर गोत्री, वडोदरा, गुजरात) आणि राणी सागर मारणे (वय २७, रा. कोथरूड) अशी आरोपी भाऊ-बहिणीची नावे आहेत.

उसणे दिलेले पैसे मिळवण्यासाठी राणी मारणे ही साक्षीदारांच्या घरी जाऊन राहत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. या प्रकरणात राणीला अटक करण्यात आली आहे. तर तिचा भाऊ सागर हा सध्या येरवडा कारागृहात आहे. राणी हिला अटक करून तिचीही कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राणीला अटक होण्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केली. दरम्यान राणी हिनेही जामिनासाठी अर्ज केला असता तिच्या जामिनाला विरोध करताना ॲड. विशाल मुरळीकर यांनी युक्तिवाद केला की, राणी हिने सागर याची पत्नी जिग्नेशा राजपूत हिच्याशी संगनमत करून फिर्यादीला धमकावून त्यांच्याकडून जुलैअखेरपर्यंत ४ लाख ४५ हजार रुपये घेतले आहेत.

या प्रकरणात तिच्या खात्यावरही पैसे जमा झाले आहेत. ती बाहेर राहिल्यास अशाच प्रकारचा गुन्हा करणार असल्याची धमकी तिने साक्षीदारांना दिला आहे. सागर याने सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहून त्यांच्या साथीदारांना पैसे कसे वसूल करायचे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ती कोणाच्या मदतीने सागर यास कारागृहात चिठ्ठी पाठवत होती याचा तपास करायचा आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळण्यात यावा. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्या. जान्हवी केळकर यांनी तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

काय आहे प्रकरण
हा प्रकार २०१८ ते २२ जून २०२१ दरम्यान कोथरूड परिसरात घडला. याबाबत ५३ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर राजपूतसह जिग्नेशा राजपूत, प्रभावती राजपूत, राणी मारणे, अमित काळे, भुड्या यांसह अन्य पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदनिकेच्या व्यवहारासाठी फिर्यादीच्या मित्राने जिग्नेशा हिच्याकडून सात लाख रुपये घेतले. त्यातील साडेपाच लाख रुपये मित्राने फिर्यादीला उसने दिले. त्याबदल्यात आरोपींनी फिर्यादीकडून २५ लाख रुपये रोख, फोन पे व बँक खात्याद्वारे बळजबरीने काढून घेतले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...