आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास भरकटलेला:दाभोळकर, लंकेशसारख्या पुरोगाम्यांच्या हत्यांच्या तपास भरकटलेलाच - डॉ. अमित थडाणी, पुण्यात 'द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यानंतर या चारही प्रकरणात तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता. असे मत डॉ अमित थडानी यांनी केले.

‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक लिहिण्यासाठी शेकडो संदर्भ पडताळले आणि 10 हजारांहून अधिक पानांची आरोपपत्रे वाचली. या पुस्तकातून मी केवळ तपासातील सत्य मांडले आहे, कोणाची बाजू घेतली नाही, असे स्पष्ट मत डॉ. अमित थडानी यांनी केले. डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी लेखिका शेफाली वैद्य, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री विद्याधर नारगोलकर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या खटल्यांमध्ये हिंदू कार्यकर्त्यांची बाजू मांडणारे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजना थडानी यांनी केले.

खूनी पालटले गेले

डॉ. अमित थडानी पुढे म्हणाले, नास्तिकतावाद्यांच्या हत्या प्रकरणात दर 2-3 वर्षांनी काही लोकांना पकडण्यात आले आणि तेच खुनी म्हणून सांगितले गेले. प्रत्येक वेळी त्यांना अडकवण्यासाठी प्रत्यक्ष साक्षीदार उभे करण्यात आले, प्रत्येक वेळी खुनी पालटले गेले, शस्त्रे पालटली गेली, शस्त्रांचे ‘फॉरेन्सिक लॅब’चे अहवाल वेगवेगळे होते. सत्य जाणण्यापेक्षा काही प्रसिद्धीमाध्यमांनीही ‘मिडिया ट्रायल’ करून तपास भरकटवण्यास हातभार लावला. याचा मोठा दुष्परिणाम या अन्वेषणावर झाला. हिंदुत्ववादी संघटनांच्या निष्पाप लोकांना अनेक वर्षे छळ करून कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे'.

अधिकार नव्हता का?

शेफाली वैद्य म्हणाल्या, या चारही खून प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी आधीच हिंदुत्वनिष्ठांना दोषी ठरवून मग पुरावे शोधले. अन्वेषण यंत्रणांनी तपासाचा उलटा प्रवास केला आहे. मात्र इतक्या वर्षांत यांतील एकाही हत्येच्या अंतिम निष्कर्षापर्यंत अन्वेषण यंत्रणा पोचू शकलेली नाही. पालघर मधील साधूंना दगडांनी ठेचून मारले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली.

त्यांच्या हत्यांविषयी कुठेच गाजावाजा झाला नाही. त्यांना जगण्याचा, न्याय मिळण्याचा अधिकार नव्हता का? जर दाभोलकरांनी अंनिसचे कार्य केलेले चालते तर सनातन संस्थेला तिचे कार्य करण्याचा अधिकार नाही का? त्यामुळे हिंदूंनी सत्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे. हे पुस्तक फक्त इंग्रजीत न प्रकाशित करता हिंदी आणि मराठीतही प्रकाशित करायला हवे.