आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अख्खं जग गांधी विचारांच्या प्रेमात; 202 देशांतून पुस्तकांचे वाचन

पुणे8 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, चीन, ब्राझील, स्पेन या देशांतून सर्वाधिक प्रमाणात आॅनलाइन मागणी

सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा या विचारांवर जीवन जगत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजासमाेर एक आदर्श निर्माण करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले. त्यांचे विचार ऑनलाइन पुस्तकाच्या माध्यमातून आजही जगभरातील २०२ देशांतून वाचले जात आहेत. अख्खं जगच गांधी विचारांच्या प्रेमात पडलंय.

मुंबईतील सर्वाेदय मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. मंडळाने महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित ३५० पुस्तके ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून दिली आहेत. गांधीजींचे विचार वाचून ते आत्मसात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन माध्यमातून रोज किमान ३०० ते ४०० पुस्तकप्रेमी याचा लाभ घेत आहेत. महात्मा गांधीजींच्या जयंती काळात हेच प्रमाण हजारांवर जात असल्याची माहिती सर्वोदय मंडळाचे विश्वस्त तुलसीदास साेमय्या यांनी दिली आहे.

इंग्रजी भाषेतील पुस्तके गुगल ट्रान्सलेशनवरून जगभरातील इतर भाषात अनुवादित हाेत असल्याने गांधीजींचे विचार माेठया प्रमाणात प्रसारित हाेत आहेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रांस,चीन, ब्राझील, स्पेन या देशातून सर्वाधिक प्रमाणात आॅनलाइन गांधी पुस्तकांचे वाचन करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांनी केवळ त्यांच्या विचारांचे लेखन केले नाहीतर त्याप्रमाणे त्यांनी दैनंदिन जीवनात या विचारांचे अनुसरणही केले. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आराेग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे काम दिसून येते. सर्वाेदय मंडळाद्वारे गांधीजींची पुस्तके गुजराती, हिंदी, मराठी, इंग्रजी या चार भाषांत उपलब्ध करण्यात आली असून ‘सत्याचे प्रयाेग’ या गांधीजींच्या आत्मकथा पुस्तकाची सर्वाधिक मागणी वाचकांकडून केली जात असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. मागील ३५ वर्षांपासून गांधीजींच्या पुस्तकांची ५० टक्के सवलतीच्या दरात विक्री केली जात आहे. यातून दरवर्षी २० ते २२ लाखांची आर्थिक उलाढाल ही हाेत असल्याचे ते म्हणाले. २००८ पासून ‘गांधी परीक्षा’ सुरू करण्यात आली आहे.

गुन्हेगारी साेडून गांधीगिरीला जीवन समर्पित; गांधीजींची पुस्तके वाचून कैद्यांचे परिवर्तन
मुंबईतील घाटकाेपर मधील चाळीत राहणाऱ्या लक्ष्मण गाेळे या मुलाच्या हातून १६ व्या वर्षी एक गुन्हा घडला आणि ताे कारागृहात गेला. कुटुंबीयांनी त्याची सुटका केली. परंतु नंतरच्या काळात मारामारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे १९ गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. त्याच्यावर तडीपारची कारवाईही झाली. साडेसहा वर्षे नाशिक कारागृहात असताना मुंबईतील सर्वाेदय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगास भेट देत गांधीजींचे ‘माझे सत्याचे प्रयाेग’ हे पुस्तक कैद्यांना वाटप केले. गांधींनी सत्य, अहिंसा तत्त्वांचे पालन करत चुका कबूल केल्या हीच गाेष्ट लक्ष्मण यास भावली. त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. न्यायाधीशांना पत्र लिहून त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. चांगली वर्तणूक केल्याने त्याची शिक्षा झाली. ताे कारागृहाबाहेर आला. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून त्याने काम सुरू करत गांधीजींचे विचार कैद्यांपर्यंत पाेहाेचवण्याचे काम हाती घेतले आहे. कैद्यांच्या परिवर्तनासाठी तो प्रयत्न करतोय.

बातम्या आणखी आहेत...