आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:आघाडी सरकारकडून लाेकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम : विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने दाेन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन घेऊन लाेकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम तसेच फासावर लटकावण्याचे काम केले आहे. अधिवेशन काळातच काेराेना गंभीर हाेत असल्याचे पाहावयास मिळते. जनतेच्या प्रश्नांवर पळ काढण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आराेप विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, महापाैर मुरलीधर माेहाेळ, आमदार सिद्धार्थ शिराेळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित हाेते.

फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने एकतर्फी अधिवेशन चालवून आमच्या १२ आमदारांविराेधात कपाेलकल्पित आराेप करून त्यांचे वर्षभरासाठी निलंबन केले. आेबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तारूढ पक्ष उघडा पडल्याने त्यांनी आमच्यावर खाेटे आराेप करून कारवाई केली. आमच्या एकाही आमदाराने शिवीगाळ अथवा धक्काबुक्की केलेली नाही. पीठासन अध्यक्षांना काेणी शिवीगाळ केली हे याेग्य वेळी मी उघड करेल. शिवसेनेचे जे लाेक त्या ठिकाणी हाेते ते आमच्या लाेकांच्या अंगावर धावून आले. आेबीसींचे राजकीय आरक्षण जाेपर्यंत मिळत नाही ताेपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आम्ही जाण्यास तयार, परंतु सर्वाेच्च न्यायालयाने या विषयासंदर्भात मागासवर्गीय आयाेग नेमून अहवाल तयार करण्यास सांगितला. त्याबाबत त्यांनी सरकारला निर्णय घेण्यास सांगावा. एमपीएस्सी परीक्षा उत्तीर्ण हाेऊन नियुक्ती न मिळाल्याने पुण्यात स्वप्निल लाेणकर या तरुणाने आत्महत्या केली ही घटना मनाला चटका लावणारी आहे. एमपीएससी प्रश्नाबाबत सरकारने गंभीर हाेऊन जबाबदारी न झटकता लवकर निर्णय घ्यावेत.

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्यावर भाजपविराेधात बाेलल्याने टीका केली जाते. त्यासंर्दभात फडणवीस म्हणाले, हरी नरके ज्येष्ठ विचारवंत असून काेणत्याही विचारवंतावर टीका करणे चुकीचे आहे. परंतु सध्या ते आेबीसींचे प्रवक्ते नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते. केंद्रावर त्यांनी आेबीसी आरक्षणाची जबाबदारी ढकलताना राज्याने अद्याप मागासवर्गीय आयाेगाची नेमणूक का केली नाही, इम्पिरिकल डाटा गाेळ करण्यास उशीर का केला, याची उत्तरे शाेधावी. सर्वाेच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या सूचनांचे त्यांनी नीट वाचन करावे. धनगर आरक्षणबाबत आमचे सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी माहिती घेतली तेव्हा पूर्वीच्या सरकारने धनगरांना एसटी वर्गात समाविष्ट करता येऊ शकत नसल्याचा अहवाल केंद्राला दिल्याने त्याबाबत फेरसर्वेक्षण करून आम्ही सुविधा देऊ केल्या.

सहकार मंत्रालयाचा राज्याला फायदा
केंद्रीय स्तरावर प्रथमच ‘सहकार’ खाते निर्माण झाले याबाबत फडणवीस म्हणाले, मागील ७० वर्षांत सहकार खाते निर्माण झाले नव्हते. प्रथमच सहकार खाते तयार झाल्याने त्याचा फायदा देशाला तसेच राज्यांना हाेईल. महाराष्ट्रात साखर कारखानदारी मरणाच्या दारात टेकली हाेती ती माेदी सरकारमुळे पुन्हा जिवंत झाली. इथेनाॅलमुळे कारखाने यापुढील काळात वाचतील व महाराष्ट्राला त्याचा माेठा फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...