आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात चोरीचे सत्र सुरूच:चोरट्यांनी 4 घरे फोडून साडेसात लाखांचा ऐवज केला लंपास; संशयितांवर गुन्हा दाखल

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून, कसबापेठ, खराडी, फुरसुंगी तसेच मुंढव्यातील म्हसोबा वस्ती येथे चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल 7 लाख 53 हजारांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी रविवारी (11 सप्टेंबर) दिली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव संजय परदेशी (28, रा. अनंतकृपा सोसायटी, कसबापेठ,पुणे ) व राकेश रजपुत यांचे घराचे दरवाजे बंद असताना चोरट्यांनी कडी कोयंडे तोडून तब्बल 4 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. हा प्रकार 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते पावणे आठच्या सुमारास घडला. परदेशी यांनी याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सानिध्या अजय द्विवेदी (22) यांच्या खराडी येथील अशोकनगरीमधील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी 25 हजारांचा कॅनन कंपनीचा कॅमेरा चोरून नेला. हा प्रकार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. याप्रकरणी त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिसर्‍या घटनेत रघुनाथ रामा माळी (60, रा. समर्थ कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी,पुणे) याच्या मुलाच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून चोरट्यांनी 1 लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 9 सप्टेंबरला पहाटे उघडकीस आला. त्यानंतर माळी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर हडपसर पोलिस ठाण्यातच महेश विष्णुपंत घेवारे (42, रा. म्हसोबा वस्ती, मुंढवा मांजरी रोड,पुणे) यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलुप चोरट्यांनी तोडून घरातील 1 लाख 38 हजारांचा ऐवज लांबवला. या सर्व घटनांमध्ये अज्ञातांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

हरियाणाच्या त्या चोरट्याला अटक

मित्रासह पुण्यात गणपतीची विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या मुलाचा मोबाईल चोरणार्‍या हरियाणा येथील चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. सहदेवसिंग चहालसिंग चौहान (30, रा. सिंकदरपुर, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत प्रणीत विश्वनाथ धनवे (17, रा. सुर्यकिरण अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरूड डेपो,पुणे) याने फिर्याद दिली आहे. हा मोबाईल चोरीचा प्रकार दगडुशेठ गणपती मंदीरासमोर 9 सप्टेंबर रोजी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

बातम्या आणखी आहेत...