आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्र उभारणीत योगदान देणारा देशभक्तच:ही पिढी भारताला सर्वोच्चस्थानी नेईल- निवृत्त ब्रिगेडियर अभय भट

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना त्यांचे स्मरण होत आहे. आजच्या काळात राष्ट्र उभारणीत योगदान देणारा प्रत्येकजण देशभक्त आहे. ही पिढी भारताला सर्वोच्चस्थानी नेण्यात योगदान देईल'' असा विश्वास आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर (नि.) अभय भट यांनी सोमवारी व्यक्त केला.

दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एआयटी) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. त्यावेळी ब्रिगेडियर भट बोलत होते. याप्रसंगी सहसंचालक कर्नल (नि.) एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशाचा विकास, स्वच्छ पर्यावरण यात योगदान, अपघातमुक्तीसाठी वाहतुक नियमांचे पालन, भ्रष्टाचार रोखण्यात पुढाकार, महिलांचा सन्मान व त्यांना शिक्षण, डॉक्टर-लष्करी जवान यांचा सन्मान हीदेखील देशभक्तीच आहे. स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांच्या त्यागातून आपणही प्रेरणा घेत देशासाठी योगदान द्यायला हवे, असे कर्नल प्रसाद यांनी यावेळी नमूद केले.विद्यार्थी व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ज्यामध्ये देशभक्तीपर गीतांचा, समूहनृत्याचा समावेश होता.

येथे स्वातंत्र्यदिन साजरा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक इथे स्वातंत्र्य दिन 2022 मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय ध्वज फडकावून आणि इतर विविध कार्यक्रम आयोजित करून हर घर तिरंगा अभियान साजरे करण्यात आले.

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राच्या मुख्यालयाचे ब्रिगेडियर आर आर कामत, स्टेशन कमांडर, पुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला. त्यानंतर युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

यावेळी सर्व अधिकारी, जेसीओ आणि मुख्यालयाचे अधिकारी, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्रातील अधिकारी आणि इतर वरिष्ठ तसेच नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर स्टेशन कमांडरच्या हस्ते मोटार सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रॅलीत 300 हून अधिक दुचाकीस्वार राष्ट्रध्वज घेऊन शांतता, समृद्धी आणि सौहार्दाचा संदेश देत सदर्न कमांड युद्धस्मारक येथून निघाले. मोटारसायकलस्वारांनी शहरातून मार्गक्रमण करत देशप्रेमाचा संदेश दिला. शेवटी कोंढवा इथे रॅलीची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...