आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक दिन विशेष सोहळा:शिवजयंती महोत्सव समितीतर्फे 51 फूट उंच स्वराज्यगुढी, सोहळ्याचे हे सलग 10 वे वर्ष

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी जयघोषात, रणशिंगाच्या ललकारीत, मर्दानी खेळाच्या चित्तथरारात आणि ढोलताशांच्या गजरात एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या स्मारकाचा परिसर सोमवारी दणाणून गेला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती आयोजित शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे. यानिमित्ताने 51 फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली. सोहळ्याचे हे सलग 10 वे वर्षे होते.

यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, टीम सरसेनापती हंबीररावचे प्रवीण तरडे, संदीप पाटील, सौजन्य निकम, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित होते. उदय सामंत व उपस्थित माताभगिनी यांच्या हस्ते भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे विधीवत पुजन करुन 51 फूट स्वराज्यगुढी उभारण्यात आली.

उदय सामंत म्हणाले, पुढील वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्वराज्य ध्वज उभारला जाईल. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा ध्वज नाही. शिवरायांच्या या स्वराज्य ध्वजातून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. याबद्दलचा शासकीय अध्यादेश लवकरच काढला जाईल. याशिवाय ज्याप्रमाणे रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. त्याप्रमाणे दरवर्षी विविध गड-किल्ल्यांवर शासनातर्फे मोठे सोहळे साजरे केले जातील. आपण सर्वांनीच शिवरायांचा आणि त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता केला. रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले.

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. यावर्षी 51 गडांवर तसेच पुण्यातील 101 गणेशोत्सव मंडळानी देखील स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा केला.

कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र कंक, समीर जाधवराव, किरण साळी, सचिन पायगुडे, निलेश जेधे, शंकर कडू, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, सागर पवार, मयुरेश दळवी, किरण देसाई यांसह असंख्य स्वराजबांधवांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...