आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Ganesha Festival Maharashtra | Ganesh Chaturthi Update | Ganeshotsav Worth 50 Thousand Crores! Estimates Of Various Elements Such As Pavilions, Decorators, Sculptors, Traders, Priests

उत्‍सव बाप्‍पांचा:यंदा गणेशोत्सव 50 हजार कोटींचा! मंडप, सजावटकार, मूर्तिकार, व्यापारी, पुरोहितवर्ग अशा विविध घटकांचा अंदाज

जयश्री बोकील | पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचा आनंद ओसंडून वाहत आहे. राज्यभरातील छोटी-मोठी गणेशमंडळे ते अगदी घरगुती गणपतीपर्यंत यंदाचा ‘श्रीं’चा हा महाउत्सव एकट्या महाराष्ट्रात 50 हजार कोटी रुपयांपर्यंत उलाढालीचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. ‘श्रीं’च्या या उत्सवात सर्वाधिक उलाढाल मंडप उभारणी व सजावटीसाठी होत असल्याचेही चित्र आहे.

राज्यभरातील मंडपवाले, सजावटकार, मूर्तिकार, मिठाई-फुलांचे-फळांचे व्यापारी, पुरोहितवर्ग व क्षेत्रातील जाणकार अशा विविध घटकांशी "दिव्य मराठी'ने संवाद साधला असता हा अंदाज पुढे आला.राज्यभरात गणेशोत्सवाचे अतिभव्य स्वरूप प्रामुख्याने पुणे आणि मुंबई येथे दिसते. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उत्सवाला 125 हून अधिक वर्षांची परंपरा आहे. काळानुरूप बदलत हा उत्सव उत्साहासोबतच आता आर्थिक उलाढालीचे मुख्य केंद्र झाला आहे. अनेक किरकोळ विक्रेते या दहा दिवसांतील उत्पन्नावर त्यांचे वर्षाचे अंदाजपत्रक बसवत असल्याची माहिती अर्थतज्ज्ञांनी दिली.

श्रींची मूर्ती हा अर्थातच प्रत्येक मंडळाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. मोठी मंडळे (मुंबई वगळता) चल मूर्ती दरवर्षी घडवतात किंवा खरेदी करतात. माती, रंग, मिश्रणे, साचे, ब्रश, रसायने, ड्रायर्स या सगळ्यांच्या किमती वाढल्याने मूर्तींची किंमतही अधिक असते. पण मंडळे विनातक्रार हा खर्च करतात. काही मंडळे सेलिब्रिटींसाठीही खर्च करतात. किमान 800 ते कमाल 5 हजार रुपयांपर्यंत चल मूर्ती खरेदी केल्या जातात.

कोरोना निर्बंध उठल्यानंतर यंदा दुप्पट उलाढाल; मंडळाचा खर्च असा...

गणेश मंडपांची उभारणी : जवळपास 50-55% गणेशमूर्ती : चल मूर्ती असल्यास खर्च मर्यादित 5%, अन्यथा 15% गणेश मूर्ती आणि मंडपांची सजावट व देखावे : 15% पुरोहित, पूजा, प्रसाद : पौरोहित्य, सत्यनारायण, याग, उपक्रम : 5% प्राणप्रतिष्ठा व विसर्जन मिरवणुका : 10% गणेशोत्सव मंडळाचे अहवाल, जाहिरात व सुरक्षा इत्यादी : 10%

मंडपांच्या खर्चात 30 टक्क्यांनी वाढ

दीपक दाते (मांडववाले) म्हणाले,‘2 वर्षांचा खंड व दरवाढीमुळे मंडप उभारणीचा खर्च सुमारे 30% वाढला आहे. राज्यात मंडपासाठी सुमारे 8 लाख वासे, बांबू, 50 लाख मीटर कपडा, 30 हजार बंडल काथ्या वापराचा अंदाज आहे. देखावे, रोषणाई, अन्य सजावट अथवा जिवंत देखावे, असे अनेक पर्याय मंडळे अवलंबतात. त्यावरही खर्च हाेतो.

20% मोदकांची ऑनलाइन विक्री

उकडीचे हातवळणीचे मोदक, मावा, खवा, कॅडबरी व सुका मेवा मोदकाला मागणी आहे. प्रतिमोदक 35 रुपये दर असून 20% मोदक ऑनलाइन विकले जात असल्याचे किशोर सरपोतदार म्हणाले. फळांत नारळ, सफरचंद, केळी, चिक्कू, पेरू यांना पसंती आहे. सर्व मंडळे प्राणप्रतिष्ठा, सत्यनारायण पुजेसह अभिषेक व याग यावरही बराच खर्च करतात.

मंडळांच्या वर्गण्यांच्याही पावत्या 501 ते 5 लाख

लहान शहरांत वर्गणीचा आकडा 100 रुपयांच्या घरात आहे. परंतु मोठ्या शहरांत 501 रुपयांचा आकडा पावतीवर छापूनच घेण्यात आला आहे. परिसरातील व्यापारी, बिल्डर्सनाही एक-दीड लाखांच्या पावत्या पाठवल्या जाताहेत. काही शहरांत राजकीय उमेदवारांकडून मिरवणुकीतील डीजेसारखा मोठा खर्च देणगीरूपातून घेण्यात येत आहे. पुण्यामुंबईतील मंडळे मोठ्या बॅनर्सकडून स्पॉन्सरशिप घेतात. यंदा त्याचा आकडा पाच लाखाच्या घरात गेला आहे.

300 कोटींची वाढ धान्याच्या खरेदीत

आनंद सराफ, अभ्यासक : 2018 आणि 19 मध्ये गणेशोत्सवाची उलाढाल 25 हजार कोटींपर्यंत होती. महागाईमुळे यंदा उलाढाल 50 हजार काेटीपर्यंत जाईल.

प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष, सीएटी : प्रसाद ते भोजन आदीसाठी साखर, मैदा, तेल, गहू आणि तांदळाची खरेदी-विक्री 300 कोटींनी वाढण्याचा अंदाज आहे.

संजय पानसरे, संचालक, मुंबई कृउबा : नारळ, केळी, मोसंबी, सफरचंद ही फळे पूजा, प्रसाद व फलाहारासाठी वापरली जात असल्याने मागणी 25% वाढली आहे.

गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन : अनेक कुटुंबाचा कल चांदीची गणेशमूर्ती, चांदीच्याच दूर्वा, हार, दागिने, पूजा साहित्य घेण्याकडे वाढतो आहे.

बातम्या आणखी आहेत...