आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षी भारतीय पुरुष संघाने मिळविलेले थॉमस करंडक स्पर्धेतील विजेतेपद हे भारताच्या बॅडमिंटन प्रगतीचे उत्तम उदाहरण असल्याचे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.
दाजीसाहेब नातू बॅडमिंटन प्रमोशन फाउंडेशनतर्फे बॅडमिंटन खेळासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल देण्यात येणारा 'महर्षी पुरस्कार' भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांना देण्यात आला. केंद्रीय क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एक वेळ अशी होती की भारतीय संघ राष्ट्रकुल बॅडमिंटन स्पर्धेसाठी देखील पात्र ठरत नव्हता. पण, आता भारतीय संघाने थॉमस करंडक या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेतेपद मिळण्यापर्यंत मजल मारली. ही कामगिरी निश्चितच भारताच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण मानता येईल, असे गोपीचंद यांनी गौरवाला उत्तर देताना सांगितले.
सरकारकडून मिळणारा पाठिंबा, उद्योजक विश्वातून मिळणारे सहकार्य, स्वयंसेवी संस्था घेत असलेला पुढाकार, विविध राज्य सरकारने बदललेला दृष्टिकोन यामुळे देशातील एकूणच क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होताना दिसत असल्याचा उल्लेखही गोपीचंद यांनी केला.
केंद्रिय क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी या वेळी मोदी सरकार क्रीडा क्षेत्राला देत असल्याचा प्रोत्साहनाचा उल्लेख केला. खेळाडू पराभूत झाला किंवा जिंकला तरी पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खेळाडूशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचा आत्मविश्वास उंचावला, असे त्या म्हणाल्या. अशा उच्च स्तरावर देशातील प्रत्येक खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा व्हायला हव्यात आणि त्यात अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी होऊन आपल्या गुणवत्तेची चाचणी घ्यायला हवी. खेळाडूच्या प्रगतीसाठी हे उपयुक्त आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
दाजीसाहेब नातू यांच्या कुटुंबीयांनी बॅडमिंटन खेळाच्या विकासाकरिता सन १९९३ साली 'दाजीसाहेब नातू प्रमोशन फाउंडेशन' या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून बॅडमिंटनच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबविले जातात. बॅडमिंटन खेळाच्या विकासासाठी ज्यांनी आजीवन आपले बहुमूल्य योगदान दिले, अशा व्यक्तीला 'महर्षी पुरस्कार' प्रदान केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.