आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्टीकडे अर्ज केलेल्या 880 जणांना फेलोशिप मंजूर करा:संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या हिवराळे यांची मागणी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात अनुसूचित जातीच्या एम.फिल व पीएच.डी करणाऱ्या व पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टी) अर्ज केलेल्या 880 संशोधक विद्यार्थ्यांना सारथी व महाज्योतीप्रमाणे कुठलीही परीक्षा किंवा मुलाखती न घेता फक्त कागदपत्राची पडताळणी करून सरसगट फेलोशिप मंजूर करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती- 2021संशोधक विद्यार्थी कृती समिती औरंगाबादच्या वतीने भरत हिवराळे यांनी बुधवारी येथे केली.

पुणे येथील बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF 2021) साठी 7 ऑक्टोंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. यात राज्यभरातील विविध विद्यापीठात एमफिल व पीएच.डी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या संशोधक 1033 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी बार्टीने परीक्षेसाठी पात्र केलेल्या 880 संशोधक विद्यार्थ्यांची बार्टी नोव्हेंबरमध्ये लेखी परीक्षा घेणार आहे. त्यानंतर त्यातून मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेवून त्यातून फक्त 200 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करणार आहे. त्यामुळे उर्वरित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे बार्टीकडे फेलोशिपसाठी आलेल्या अर्जातून पात्र झालेल्या 880 संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती- 2021 मंजूर करावी. अन्यथा विद्यार्थी कृती समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने अनुसूचित जातीच्या न्याय, हक्कासाठी लढा उभारून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हिवराळे यांनी दिला आहे.

सारथी फेलोशिपसाठी अर्ज केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांची कुठलीच परीक्षा किंवा मुलाखती न घेता केवळ कागदपत्राची पडताळणी करून सारथी 856 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली आहे. मग, अनुसूचित जातीच्याच केवळ 200 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप का ? त्यांनाही सरसगट 880 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करा, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा भरत हिवराळे यांनी दिला आहे.

त्या 194 जणांना फेलोशिप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-2018 च्या एम.फिलच्या 194 फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डीपर्यंत नियमित फेलोशिप मिळावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2018 संशोधक विद्यार्थी कृती समिती औरंगाबादच्या वतीने वेळाेवेळी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एमफिलच्या 194 फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप नियमित करण्याचे आदेश दिले. या आदेशाला एक वर्ष उलटत आले तरी बार्टीने एमफिलच्या 194 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डीपर्यंत फेलोशिप मंजूर केल्याची यादी अद्यापही बार्टीच्या संकेतस्थळावर टाकली नाही. त्यामुळे या 194 संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, असेही भरत हिवराळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...