आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजेंची नवी राजकीय इनिंग:अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार, 'स्वराज्य' संघटनेची स्थापना; लवकरच राज्याचा दौरा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आणि स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज केल्या आहेत. खासदारकीची मुदत संपल्यानंतर आज गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की आज मी दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जुलैमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी,1 सेना ,1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदलले आहे. भाजपला दोन, काँग्रेसला 1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे. अपक्ष म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा. जे छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांना व्हीप नाही त्यांनी जाहीर भूमिका घेत मला समर्थन द्यावे. माझ्या कामाची दखल घेत आपण मला राज्यसभेत पाठवावे म्हणून मी सर्वपक्षांना विनंती करु इच्छितो. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाहीये.

याच महिन्यात राज्याचा दौरा

संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, माझा दुसरा निर्णय 2007 पासून 2022 पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. मी शिव-शाहूंचा वंशज आहे. वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक मला पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. छत्रपती घराण्यांवर प्रेम करणाऱ्या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे.

त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी, अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी, शिवाजी महाराजा आणि शाहू महाराजांचे नाव जगभरात गाजवण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली आहे. 2007 पासून 2022 पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातले 5-6 दिवसच जातो. पण लोकसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्त्वाची आहे. दोन निर्णय मी घेतले आहेत.

स्वराज्य संघटनेचा झेंडा, रंग काय?

संभाजीराजे यांनी सांगितले की, स्वराज्य संघटनेचा प्रसार होण्यासाठी, स्वराज्य संघटीत करण्यासाठी मी लवकरच या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करणार, लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्यच्या नावाखाली संघटीत करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना झाल्याचं मी जाहीर करतो.

ही संघटना, स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगं समजू नये आाणि माझी त्याला तयारी सुद्धा आहे. तसेच संघटनेचं चिन्ह अद्याप काही ठरवलेलं नाहीये. रंग कुठला ते सुद्धा ठरेवलेलं नाहीये. ज्यावेळी दौरा करेल त्यावेळी नागरिक सुचवतील हा रंग घ्या, हे चिन्ह घ्या. पण रक्तात आणि ह्रदयातील हा केशरी पट्टा तर कुणी काढू शकत नाही.

खासदारकीची मुदत मंगळवारी संपली -

संभाजीराजे छत्रपती यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवत कोल्हापूरच्या राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, संभाजीराजेंनी पराभवानंतर राजकारणापासून थोडी अलिप्तता स्वीकारली. यानंतर 2016 मध्ये भाजपने त्यांना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. पण सहा वर्षात संभाजीराजेंनी या पक्षाच्या व्यासपीठावर जाण्याचे टाळले. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत मंगळवारी संपली आहे.

चर्चांना पुर्णविराम -

संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करु, असे जाहीरपणे सांगितले होते. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करु असे म्हटले होते.

याशिवाय, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने छत्रपती भाजपमध्ये जातील अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे संभाजीराजेंची पुढील राजकीय दिशा नेमकी काय असणार, याबाबत ट्विस्ट निर्माण झाला होता. आज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका जाहीर केल्याने या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...