आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर विज्ञानवादी भूमिका स्वीकारा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते बारामतीमध्ये बोलत होते.
बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरची उभारण्यात करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. विशेष म्हणजे उद्योगपती अदानी यांच्या स्वागतासाठी आणि गाडीचे सारथ्य करण्यास आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी सकाळी हजेरी लावली.
काय म्हणाले पवार?
शरद पवार म्हणाले की, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल, तर विज्ञानवादी भूमिका स्वीकारावी लागेल. व्यक्तीचे मन तयार होण्यासाठी भाकड कथांपेक्षा विज्ञान आधारित गोष्टी अधिक प्रमाणात जाणणे महत्वपूर्ण आहे. विज्ञानामुळे आपण चंद्रावर, मंगळावर जातो हे अशक्य बदल आपण प्रत्यक्षात आणले आहे. हा प्रकल्प पाहिल्यावर आत्मविश्वास वाढेल आणि प्रोत्साहन देईल.
इनाेव्हेशन सेंटर उभारणार
अजित पवार म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यात विज्ञान आवड निर्माण करणे आणि भविष्यात सदर भागातील शास्त्रज्ञ घडवणे यादृष्टीने सायन्स अँड इनाेव्हेशन सेंटर महत्वपूर्ण आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येक जिल्हयात सायन्स अँड इनाेव्हेशन सेंटर उभे करण्यात येईल, त्याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. प्रदर्शनात सहभागी हाेण्यासाठी 36 जिल्हयातील 205 प्रकल्पांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना या प्रर्दशनातून विज्ञान आवड निर्माण हाेईल, अशी अपेक्षा आहे. जगभरात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल हाेत आहे. भारतातील शिक्षणाच्या तुलनेत परदेशातील शिक्षण पध्दत काैशल्य आधारित असून आपल्याला प्रगती करण्यासाठी विज्ञानावर आधारित शिक्षण सुरु करणे काळाची गरज आहे. काैशल्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्राधान्याने सरकार काम करत आहे.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सायन्स पार्क असून या सायन्स पार्कच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन दिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 36 जिल्ह्यातील 250 विविध वैज्ञानिक प्रकल्प सहभागी होणार आहेत. राज्यभरातील 127 शाळांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या तज्ञ व्यक्तींचे फन सायन्स शो, जादूचे प्रयोग, विज्ञान कार्यशाळा, स्टँडअप कॉमेडी अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सहा हजार विद्यार्थी व सहाशे शिक्षक उपस्थित राहिले आहेत.
सायन्स पार्कमध्ये काय?
सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. या माध्यमातून शालेय जीवना पासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील प्रत्येक कुतूहल असणाऱ्या गोष्टीविषयी आपल्या वेगळ्या सिद्धांताची मांडणी करू शकतील. तसेच त्यांच्यात लहानपणीच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागणार असल्याची माहिती आयोजकानी दिली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चरल गॅलरी, 3 डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रीलिटी अशा स्वरुपाचे तंत्रज्ञान येथे पाहायला मिळेल.
शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
जपान, कोरिया आणि चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळं तेथील तरुण संशोधक टेलिकॉम, ऑटोमोबाइल, होम अप्लायन्सेस या क्षेत्रात भरीव प्रगती करत आहेत. याचमुळं कोडिंग डेटा सायन्स डिजिटल मार्केटिंग डिझाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या सेंटरमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.