आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहिहंडी उत्सवानिमित्त पुण्यात आज वाहतुकीत बदल:शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फिरत्या रूग्णवाहिकेचे असणार दहिहंडीकडे लक्ष

कोरानानंतर मोठ्या उत्साहत दहिहंडी उत्सवासाठी नागरिक शहरात येण्याची शक्यता पाहता वाहतूक पोलिसांच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता.19) सायंकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवहन वाहतुक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता या रस्त्यांवर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहिहंडी उत्सव मंडळांकडून दहिहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणार्‍या दहिहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

असे असतील पर्यायी मार्ग

- छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन स्वारगेटला जाणार्‍या वाहनांनी स.गो.बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छित स्थळी जावे

- पुरम चौकातुन बाजीराव रस्त्याने जाणार्‍या वाहनचालकांनी पुरम चौकातुन टिळक रस्ता, टिळक चौक, फर्ग्युसन महाविद्याल रस्त्याने पुढे जावे

- स.गो.बर्वे चौकातुन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने महापालिकेकडे जाणार्‍या वाहनांनी स.गो.बर्वे चौकातुन जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातुन डावीकडे वळून महापालिकेकडे जावे

- रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे जाणारी आणि सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्याने सरळ सेवासदन चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे.

- मजुर अड्डा चौकातुन अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सुरु ठेवण्यात येईल. त्यामुळे अप्पा बळवंत चौकातुन मजुर अड्डा चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रस्त्याने पुढे जाईल.

फिरत्या रूग्णवाहिकेचे असणार दहिहंडीकडे लक्ष

दरवर्षी दहीहंडीच्या निमित्ताने होणार्‍या समारंभात अनेकदा अति उत्साहाच्या भरात, पुरेशी काळजी न घेतल्याने काही गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने दहीहंडी साजरी करणार्‍या मंडळांच्या परिसरात सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. रूग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टर, स्वयंसेवक, आपत्कालीन उपचारांसाठी लागणार्‍या वस्तू ,औषध यांचा समावेश असणार आहे. रुग्णवाहिका बेलबाग चौक, अलका टॉकीज चौक येथे आणि एक रुग्णवाहिका फिरती असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...