आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐन मध्यान्ह समयी, भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नांदुर्कीच्या वृक्षाची पाने सळसळली आणि त्या क्षणी जगद्गुरू तुकाराम महाराज बीजसोहळा साकार झाला. लक्षावधी हात श्रद्धेने जोडले गेले. 'जय जय रामकृष्णहरी' असा घोष झाला आणि श्रीक्षेत्र देहूनगरीत संत तुकाराम महाराज बीजसोहळ्याचा अनुभव घेतला.
आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा, असे म्हणत ज्यांनी सदेह वैकुंठगमन केले, असे परंपरा मानते, त्या जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा बीजसोहळा गुरुवारी मध्यान्ही साजरा झाला. तुकाराम महाराजांचा 375 वा बीजसोहळा देहू येथे लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकोबारायांनी देहू येथील नांदुर्कीच्या वृक्षानजिक सदेह वैकुंठगमन केले, असे आपल्या परंपरेत मानले गेले आहे. त्यामुळे तुकोबांचा वैकुंठगमन दिवस, हा त्यांचा बीजसोहळा म्हणून साजरा केला जातो.
2 लाख भाविकांची उपस्थिती
या सोहळ्याच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूनगरीत दाखल झाले आहेत. आषाढी वारीप्रमाणेच बीजसोहळा करणारेही भाविक दरवर्षी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. सलग दोन वर्षे बीजसोहळा होऊ शकला नव्हता. यंदा बीजसोहळ्याचे 375 वे वर्ष आहे. त्यामुळे राज्यातून सुमारे दोन लाख भाविक बीजसोहळा अनुभवण्यासाठी देहूनगरीत उपस्थित आहेत, असे देहू नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी सांगितले.
बीजसोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
देहूनगरीत बीजसोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या साठी स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांना अत्याधुनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी, वीजपुरवठा तसेच कचरा संकलनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. बीजसोहळ्याच्या काळात वाहतुकीचे वेगळे नियोजन केले आहे. भाविकांना दर्शनसुविधा तसेच प्रसाद सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
धार्मिक उपक्रमांची रेलचेल
जगद्गुरू तुकाराम महाराज बीजसोहळ्याच्या निमित्ताने देहूनगरीत आठवडाभर विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन, प्रवचन, लळित, गाथापठण, चक्रीभजन, हरीनाम सप्ताह असे अनेक उपक्रम होणार आहेत. बीजसोहळ्याचे मुख्य कीर्तन, काला कीर्तन, महाप्रसाद कीर्तन यांच्यासह आठवडाभर रोज पहाटे काकडा, महास्नान, महापूजा, प्रसाद होणार आहे, अशी माहिती देहू देवस्थानकडून देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.