आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या नव्या भारताची संकल्पना मांडली जात आहे पण या नव्या भाराताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असूच शकणार नाहीत तर नव्या भारताचे प्रणेते नथुराम गोडसे असतील, अशी भीती महात्मा गांधी यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी रविवारी येथे व्यक्त केली. देशात सध्या घृणेचे राजकारण सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो'चा नारा दिला त्या प्रमाणे ‘घृणा सोडा' असा नारा दिला जाण्याची आज गरज आहे, नाही तर भारतीय पुन्हा एकदा गुलाम बनतील असे त्यांनी नमूद केले.
जैन धर्माचे गाढे अभ्यासक स्व. सुखलालजी फौजमलजी खाबिया यांच्या स्मरणार्थ श्री जैन सामुदायिक उत्सव समिती व श्री सकल जैन संघ, पुणेच्या वतीने गांधी यांना पहिल्या ‘जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे होते. 51 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्यासह अचल जैन, विजयकांत कोठारी, मिलिंद फडे, लक्ष्मीकांत खाबिया, अभय छाजेड, आमदार रवींद्र धंगेकार व्यासपीठावर होते.
तुषार गांधी म्हणाले, महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांविषयी दररोज नवनवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बापूंवर महावीरांच्या विचारांचा पगडा होता कारण त्या विचारांमध्ये सर्वधर्मातील विचारांचा स्वीकार आहे. बापूंनी सांगितलेल्या अहिंसेचा पूर्ण अर्थ समजून मग ती आचरणात आणणे गरजेचे आहे,'.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महात्मा गांधी यांनी भगवान महावीर यांच्या शिकवणीचा अभ्यास करून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न केला. तुषार गांधी हे फक्त गांधी परिवारचे सदस्य नसून ते महात्मा गांधी यांची शिकवण समाजापर्यंत नेऊन मूलभूत बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने पाठ्यपुस्तकांमधून महात्मा गांधी यांचे संदर्भ गाळल्याचा उल्लेख करून चव्हाण म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारांचा तसेच स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा पुन्हा एकदा अभ्यास होणे गरजेचे आहे. महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक गुणात्मक उपक्रम राबविणे आवश्यक आहे.
अध्यात्म आणि व्यावहारीक ज्ञान वेगळे समजले जाते परंतु महात्मा गांधी यांनी या दोन्हीत नाते जोडायचा आणि व्यवहाराला आध्यात्मिक बैठक देण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांचे राजकारण पंडित नेहरू यांनी तर अध्यात्म विनोबा भावे यांनी आत्मसात केले, असे मोरे म्हणाले.
अचल जैन यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना उपक्रमाविषयी माहिती दिली तर लक्ष्मीकांत खाबिया यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.