आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथील पाषाण टेकडीवर फिरायला गेलेल्या संगणक अभियंता व त्याच्या मैत्रिणीला मारहाण करून तसेच धमकावून लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुण्याच्या चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. बांधकामांवर मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या या दोघांवर मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत तब्बल १४ लूटमारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली. गणेश ऊर्फ लहू रामभाऊ चव्हाण (रा. लोणीकंद, ता. हवेली, मूळ ता. जिंतूर, जि. परभणी) आणि राजू मंजूनाथ जगताप (रा. नसरापूर, ता. हवेली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
संगणक अभियंता असलेला तरुण व त्याची मैत्रिण पाषाण टेकडीवर बसले असताना तीन अनोळखी जणांनी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केली. ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या बँक खात्यातून फोनपेच्या माध्यमातून ७६ हजार रुपये एका खात्यावर वर्ग करून घेतले. याप्रकरणी अभियंता तरुणाने तक्रार दिल्यानंतर गणेश व राजू यांनी हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे, जालना, नाशिक, पुणे ग्रामीण, अहमदनगर येथील विविध पोलिस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी असे एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलिस निरीक्षक दादा गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार सुधाकर माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
यूपीआयवरील व्यवहारावरून आरोपी गजाआड
आरोपींनी जोडप्याला जबर मारहाण केली होती. यानंतर त्यांनी तरुणीचा मोबाइल फोडला तर तरुणाचा मोबाइल फेकून दिला होता. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सर्च ऑपरेशन राबवले असता त्यांना फिर्यादी तरुणाचा मोबाइल सापडला. त्यातून पैसे वर्ग केलेल्या यूपीआय खात्याचा नंबर मिळाला. मात्र बँका सलग तीन दिवस बंद असल्याने आरोपींची माहिती मिळू शकली नाही. बँक उघडल्यावर आरोपी गणेशच्या खात्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.