आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदय सामंतांवरील हल्लाप्रकरण:शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन, राजकीय आकसातून कारवाई केल्याचा आरोप

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांना न्यायालयाने आज अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.

विविध अटींवर जामीन

तीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर धनवडे आणि थरकुडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये, आरोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

शिवसेनेच्या 6 पदाधिकाऱ्यांना अटक

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची मंगळवारी रात्री कात्रज चौकात सभा झाल्यानंतर तेथून जाणाऱ्या सामंत यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. याबाबत सामंत यांच्या वाहनचालकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली असून, धनवडे, थरकुडे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धनवडे व थरकुडे यांनी अ‌ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

राजकीय आकसातून कारवाई

राजकीय आकसातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटी कारवाई करण्यात येत आहे. ही घटना घडली तेव्हा अर्जदार घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. बचाव पक्षातर्फे अ‌ॅड. ठोंबरे यांच्यासह अ‌ॅड. हितेश सोनार व अ‌ॅड. शिवम पोतदार यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...