आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटी:पदवी प्रवेशासाठी सीईटी नाही, बारावीचेच गुण ग्राह्य धरणार; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या परिस्थितीनुसार या तारखांमध्ये बदल होऊ शकतो : मंत्री सामंत

राज्यातील विद्यापीठे-महाविद्यालयांच्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशांची प्रक्रिया बारावीच्या गुणांनुसारच राबवली जाणार आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. यंदा अंतर्गत मूल्यमापनानुसार बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर विद्यापीठे-महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसह बैठक झाल्यानंतर सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली.

सामंत म्हणाले,’ प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी घेण्यास आता पुरेसा अवधी नाही. त्यामुळे बारावीच्या गुणांनुसारच प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे महाविद्यालयांना आता प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल. जागा कमी पडत असल्यास आवश्यकतेनुसार तुकडी वाढ करता येईल. त्याबाबत ३१ तारखेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

स्वायत्त महाविद्यालयांना सीईटीसाठी असेल मुभा
प्रथम वर्ष प्रवेशासाठी स्वायत्त महाविद्यालयांना सीईटी घेता येईल. मात्र ही प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करणे शक्य असल्यासच ही परीक्षा घेण्याची मुभा मिळू शकेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न
यूजीसी वेळापत्रकानुसार नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली जाईल. महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रयत्न केला जाईल.

विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी २६ ऑगस्टपासून
पुणे | राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापनशास्त्र आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी २६ ऑगस्टपासून होणार आहेत. बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी ४ ते १० सप्टेंबर व १४ ते २० सप्टेंबर अशा २ सत्रांत होईल.

एमएचटी सीईटी ४ सप्टेंबरपासून २ सत्रांत
१. औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी या बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठीची एमएचटी-सीईटी ४ ते १० सप्टेंबर आणि १४ ते २० सप्टेंबर अशा दोन सत्रांत होईल.
२. एमबीए , हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला आदी अभ्यासक्रमांच्या सीईटी २६ ऑगस्टपासून सुरू होतील
३. शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, एकात्मिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची सीईटी २६ ऑगस्टपासून सुरू होईल.
४. तीन वर्षे मुदतीचा विधी अभ्यासक्रम (एलएलबी), ५ वर्षे मुदतीला विधी अभ्यासक्रमाची (एलएलबी) सीईटी १६ सप्टेंबरपासून सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...