आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलोत्पादन पिकांसाठी राष्ट्रीय परिषद:कृषीत अग्रेसर होण्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : तोमर

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मूल्य साखळी वृद्धीच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी पुण्यामध्ये केले.

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत ‘फलोत्पादन पिकांमधील मूल्य साखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. बैठकीस राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा, राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते. तोमर म्हणाले, ॲग्री स्टार्टअप, कृषी विमा, बाजारपेठेची उपलब्धता आदींद्वारे शेतकऱ्यांना संपन्न करण्याचे प्रयत्न होत आहेत. सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी, यासाठी सुविधा देण्यात येत आहेत. याचा परिणाम म्हणून नवी पिढी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे आकर्षित होत आहे. नैसर्गिक शेतीकडे शेतकरी आकर्षित होत आहेत. कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन देशाला कृषी क्षेत्राला अग्रणी राष्ट्र बनवता येईल. देश खाद्यान्न उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. इतर शेती उत्पादनातही पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहोत. देशाला फुलशेती, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रातही चांगली संधी आहे. केंद्र सरकार क्लस्टर कार्यक्रम, शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ), फलोत्पादन मिशनद्वारे लहान शेतकऱ्यांना एकत्रितपणे काम करून उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

फलोत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर महाराष्ट्र फलोत्पादन क्षेत्रात अग्रेसर असून देशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. देशातून या वर्षी ३४२ दशलक्ष मेट्रिक टन विक्रमी निर्यात केली. परंतु या क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता बीजोत्पादनापासून निर्यातीपर्यंतची मूल्य साखळी विकसित करावी लागेल. यासाठी देशात ५५ क्लस्टर विकसित करण्यात येत आहेत, असे केंद्रीय सचिव आहुजा म्हणाले.

भरडधान्य, भाजीपाला उत्पादनावर अधिक लक्ष देणे गरजेचे आज पारंपरिक खाद्यान्न शेतीसोबत फलोत्पादन, भरडधान्य आणि भाजीपाला उत्पादनावरही लक्ष द्यावे लागेल. भारताच्या प्रयत्नामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (मिलेट्स इयर) म्हणून साजरे होणार आहे. फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबत रोजगार निर्मितीही होईल. हे करताना शेतकऱ्याला अधिक लाभ होईल, याचा विचार या साखळीतील इतर घटकांनी करायला हवा. आर्थिक प्रतिकूलतेतही कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे कार्य करत असल्याने त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. ग्रामीण क्षेत्र देशाचा आत्मा आहे. गाव स्वावलंबी झाल्यास देश स्वावलंबी होईल.

बातम्या आणखी आहेत...