आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चांना उधाण:वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, मनसेचे फायरब्रँड नेते हातात शिवबंधन बांधणार का?

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याची चर्चा गेल्या महिन्यात होती. यातच आज बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची वसंत मोरेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यात एका लग्रात राऊत आले होते, तेव्हा मोरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी राऊतांनी मोरेंच्या कामाचे कौतुक केले.

मनसेमध्ये नाराज असलेले पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर ते पक्षांतर करणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे. वसंत मोरे यांना नावाने नाही तर 'तात्या' म्हणून ओळखले जाते आणि त्याच नावाने राऊत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी मोरे यांच्याकडे आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत जागा कशा सुटल्या आहे, आरक्षण कसे आहे याचीही विचारपूस केली.

संजय राऊत यांनी मोरे यांचे ठाण्यातील भाषण ऐकले होते, अशी ही वसंत मोरे यांनी माहिती दिली आहे. यावेळी जाता-जाता संजय राऊत यांनी भेटू असे म्हणत वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली? अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसेत नाराज असलेले वसंत मोरे हातात शिवबंधन बांधणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेंची ओळख

गेली 27 वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तर 2006 साली मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज यांची साथ न सोडता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो, पण राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या भूमिकेला वसंत मोरे यांनी ठामपणे विरोध दर्शवला होता. यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली. त्यांच्याजागी साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर वसंत मोरे चर्चेत आले होते.

बातम्या आणखी आहेत...