आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन, पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले

प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे (वय 78) यांचे सोमवारी सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. 'बाई', 'पाणी' या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी 1995 मध्ये 'दोघी' हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'एक कप च्या', 'घो मला असला हवा', 'कासव', 'अस्तु' हे चित्रपट गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

'विचित्र निर्मिती' या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन तेंडुलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले. भावे यांचा जन्म 12 जानेवारी 1943 मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली.

पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निधनामुळे पुण्यातील, तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...